वैजापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. उद्या सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शाह यांची सभा भाजपाकडून आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, आक्रमक मराठा आंदोलकांनी शाह यांच्या सभेची माहिती देणारे आणि स्वागताचे बॅनर वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे आज दुपारी फाडले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर सरकारचा निषेध केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
लोकसभा निवडणुकीचे जवळ आली असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात मराठा कुणबी आरक्षण आंदोलनाने जोर धरला असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा मंगळवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सभेची माहिती देणारे बॅनर भाजपाकडून उभारण्यात आले आहेत. आज सकाळी अजय पाटील साळुंखे इतर मराठा आंदोलकांनी शाह यांच्या सभेचे बॅनर फाडून मराठा आरक्षण ओबीसीतून दिले नसल्याचा निषेध व्यक्त केला.
सरकारचा निषेध करत फाडले बॅनरकुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलन सुरू आहे. कुणबी नोंदी संपल्यानंतर सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. ओबीसीतून आरक्षण मिळाले नसल्याने मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच आज दुपारी मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर सरकारचा निषेध करत आंदोलकांनी वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले. एक मराठा, लाख मराठा, ओबीसीतून आरक्षण द्यावे, शेतमालास भाव द्यावा अशा मागण्या करत आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.