छत्रपती संभाजीनगर : बार्टी संस्थेच्या धर्तीवर सारथी संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठीची शिष्यवृत्ती संशोधकांना विद्यापीठाने दिलेल्या नोंदणी दिनाकांपासून देण्यात यावी, या मागणीसाठी सारथी संस्थेच्या विभागीय कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून साखळी आंदोलन सुरू केले आहे.
मराठा समाजातील पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना सारथी संस्थेतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती विद्यापीठाने दिलेल्या नोंदणी दिनाकांपासून देण्यात यावी, या मागणीसाठी १८ एप्रिल रोजी मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यात मागणी मान्य करण्यात आली आहे. या बैठकीत बार्टीच्या धर्तीवर सारथीच्या संशोधकांनाही शिष्यवृत्ती नोंदणी दिनाकांपासूनही देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे अद्यापही नोटिफिकेशन निघालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
त्यासाठी १ ऑगस्टपासून राज्यभरात संशोधकांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. देवगिरी महाविद्यालय परिसरातील सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी सकाळपासून उपोषण सुरू केले. यामध्ये राहुल निकम, सुशील जानकर, अंगद पानसंबळ, सचिन बोराडे, काकासाहेब गरुड, धर्मराज जाधव, अजय पवार, दैवत सावंत, भारत सुरवसे, राधा मोरे, बालाजी दळवी आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.