औरंगाबाद: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने विभागीय आयुक्तालयासमोर आज दुपारी उत्स्फूर्त आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. यावेळी वातावरण बिघडविण्याची परिस्थिती निर्माण झाली असता खासदार इम्तियाज जलील आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आंदोलन करणे आपला हक्क असून ते शांतेत करावे, असे आवाहन खा. जलील यांनी आदोलकांना केले. तसेच नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर भाजपने केलेली कारवाई पुरेसे नसून कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांसह खा.जलील यांनी केली.
पैगंबरावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पेटलेले वातावरण शांत होण्याचे नाव घेत नसून आज नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करत औरंगाबाद, जालना, सोलापूर येथे मुस्लीम समाजाने आंदोलन केले. आज एमआयएमने विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन होते. दरम्यान, दुपारच्या नमाजनंतर शहरातील मुस्लीम समाजाने उत्स्फूर्तपणे विभागीय कार्यालयासमोर जमा झाला. नुपूर शर्माच्या विधानाच्या निषेधार्थ जमावाने जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अचानक मोठा जमाव जमा झाल्याने काही समाजकंटक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, खासदार इम्तियाज जलील आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ आज शहरातील काही भागात बंद पाळण्यात आला.
केंद्राने कायदा करावाभाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. मात्र, ही कारवाई पुरेसी नाही. शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच देशात धर्मांवर आक्षेपार्ह टीका करणे वाढत जात आहे. यासाठी केंद्राने कायदा करावा.- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद