औरंगाबाद : आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या मुख्यालयी न राहाण्याचा मुद्दा छेडला आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. आज रविवारी दुपारी भरपावसात औरंगाबादेत हजारो जि.प. शिक्षकांसह शिक्षक आमदार, पदवीधर आमदार एकवटले. शिक्षकांना मुक्त वातावरणात शिकवू द्या, मुलांची गुणवत्ता आहेच ती आणखी वाढविण्यासाठी शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करा, यावर सरकारला धारेवर धरले.
तेथून या शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर आत्मसन्मान रैली नेली. शिक्षक भारतीचे नेते आ. कपिल पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद देत या रैलीत औरंगाबादसह विविध जिल्ह्यांतील जि.प. शिक्षक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे आदी हजारोंच्या संख्येनेसहभागी झाले आहेत.
शिक्षक आणि आमखास मैदानाचे तसे अतूट नाते राहिले आहे. - ४ ऑक्टोबर २०१६ रोजी शिक्षकांनी याच मैदानावरुन विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर विराट मोर्चाचे आयोजन केले होते. तेव्हा पोलिसांनी तुफान लाठीमार केला होता.- त्यानंतर ८ ऑगस्ट २०२२ रोजी जि.प. शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनेविविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा नेला होता.