औरंगाबाद : ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात यावी, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे,ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, औरंगाबाद जिल्हा शाखेतर्फे मंगळवारी आकाशवाणी चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. ते लक्षवेधी ठरले.
जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळ यांची बदनामी आम्ही कदापिही सहन करणार नसल्याचा इशारा देत घोडके यांनी सांगितले की, मराठा समाजाला मिळावे ही समता परिषदेची प्रामाणिक भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. या आंदोलनानिमित्त झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पार्वताबाई शिरसाट या होत्या.
.........................................
जो ओबीसी हित की बात करेगा....
जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एकच चळवळ, छगन भुजबळ, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमा सभास्थळी ठेवण्यात आल्या होत्या.
........................
छगन भुजबळ यांचा चेहरा....
समता परिषदेचे कार्यकर्ते गजानन सोनवणे, अमोल तुपे, चंद्रकांत पेहरकर, गणेश काळे आदींनी विविध पेहराव केला होता. तीन कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा मुखवटा लावून लक्ष वेधले. आंदोलकांच्या डोक्यावर मी ओबीसी अशी अक्षरे कोरलेल्या टोप्या होत्या. शिवाय हाताला काळी फीत लावली होती.
माजी नगरसेविका कीर्ती शिंदे, सरस्वती हरकळ, जयराम साळुंके, एल. एम. पवार, हिरामण चव्हाण, महादेव आंधळे, प्रा. सुदाम चिंचाणे, मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, प्राचार्य सरोज नवपुते आदींची यावेळी भाषणे झाली. राजाभाऊ शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी सुरेश बनसोड, निशांत पवार, वामन भागवत, साईनाथ करवंदे, प्रकाश शिरसे, योगेश हेकाडे, संदीप घोडके, अर्जुन गाडेकर, राजेंद्र दारुंटे, सचिन गोरे, देवीदास सोनवणे, अमोल कुदळे, विनायक पाराशर, प्रशांत वाणी, ज्ञानेश्वर जेजूरकर, बाबासाहेब जाधव, अशोक गोरे, शिवानंद झोरे, अनिता देवतकर, सुभद्रा जाधव, द्वारका पवार, रोहिणी काळे, विलास गाडेकर, साळूबा पांडव, संजय फटाकडे, गणेश अंबेकर, सीमा नाईक, आबासाहेब शिरसाठ, नारायण फाळके, संजय कुदळे आदी प्रमुख कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.