वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ वाळूज उद्योगनगरीत गुरुवारी (दि.२६) कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
कृती समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता पंढरपुरातील तिरंगा चौकापासून गुडईअर कंपनीपर्यंत मानवी साखळी उभारून कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनात सिटू, आयटक, भाकासे, महाराष्ट्र कामगार विकास संघटना, न्यू पँथर पाॅवर कामगार सेना, इंटक, मराठवाडा विकास सेना, सिमेट, बीकेटी, विप्रो, एनआरबी आदी कामगार संघटना सहभागी होणार असल्याचे कृती समितीचे प्रसिद्धी प्रमुख कॉ. शंकर नन्नुरे यांनी कळविले आहे.
------------------------
चोरट्याने दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील सखाराम पवार हा २१ नोव्हेंबरला दुचाकी (एम.एच.२०, सी.डब्ल्यू ७०९४)ने वाळूज एमआयडीसीतील मनीषा इंजिनिअरिंग (प्लॉट नंबर के-१३६) या कंपनीत कामासाठी गेला होता. कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------
पंढरपुरात समाज प्रबोधन
वाळूज महानगर : पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. कल्याण महाराज भुजंग यांनी सोमवारी (दि.२३) भाविकांना प्रबोधन केले. यावेळी कीर्तनातून प्रबोधन करताना ह.भ.प. कल्याण महाराजांनी विविध अभंगांचे दाखले देत आपल्या मधुर वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले.
----------------------
उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात थंडीचा जोर वाढल्यामुळे नगर रोडवर उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे स्वेटर, मफलर, ग्लोज आदी उबदार कपडे खरेदी करण्यासाठी कामगार गर्दी करीत आहेत.
-----------------------------
मोरे चौकात मोकाट जनावरे रस्त्यावर
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोरे चौकात मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर, तसेच नागरी वसाहतीत फिरकत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
--------------------