आंदोलनामुळे महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस पक्षानेच सरकारच्या आवाहनाला खो दिला. कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एनएसयूआय महाराष्ट्र अध्यक्ष अमीर शेख यांच्या सूचनेनुसार इंधनवाढीवर चुप्पी साधणारे अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचा निषेध केल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे आंदोलन पूर्वनियोजित होते, असा दावा शहाराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करू नका, असे आवाहन केल्यानंतर कॉंग्रेस या निर्णयाला हरताळ फासत आहे का, असे विचारता ते म्हणाले, हे आंदोलन एक दिवस अगोदरच ठरवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी रात्री सूचना केल्या होत्या. त्यामुळे आम्ही कमी लोकांच्या उपस्थितीतच हे आंदोलन केले. मराठवाडा कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अहमद चाऊस, इम्रान पठाण, मुजफ्फर खान, मोहसीन खान, सलमान नवाब पटेल, एम.ए. अजहर, सलीम खान, सय्यद जुबेर आदींची उपस्थिती होती.
दलित महासंघाचे आंदोलन
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मातंग समाजाची उपेक्षा होत आहे. गेल्या सहा वर्षापासून मातंग समाजासाठी स्थापन झालेले अण्णा भाऊ साठे महामंडळ निधी नसल्यामुळे निष्क्रिय आहे. या महामंडळाला एक हजार कोटी भांडवल द्यावे यासह विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मच्छिंद्र सकटेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुरेश चव्हाण, पुष्पलता सकटे, लक्ष्मीबाई पवार, शंकर महापुरे, सुरेश कांबळे, बापुराव दुधारे, सचिन दाभाडे, सिद्धार्थ सदाफुले, संतोष चांदणे यांची उपस्थिती होती.
रिपब्लिकन सेनेचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
रिपब्लिकन सेनेने इंधन व गॅस दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गॅसचे भाव एक हजार रुपये प्रति सिलिंडरप्रमाणे होण्याचे संकेत दिसत आहेत, तर पेट्रोल १०० रुपये लीटर होण्यावर आहे. ही दरवाढ केंद्रशासनाने कमी करावी. गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे जगणे या महागाईमुळे मुश्कील झाले आहे. आंदोलनात शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे, काकासाहेब गायकवाड, सुनील मनोरे, बबन साठे, मनीषा साळुंके आदींनी सहभाग नोंदविला.