सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने रोजंदारी अप्रशिक्षित कर्मचाºयांवर या दलाचा डोलारा उभा आहे. आठवडी बाजार परिसरात अग्नीशमन दलासाठी उभारण्यात आलेले वाहनतळ व कायमस्वरुपी कर्मचाºयांसाठी उभारण्यात आलेली निवासस्थाने गेल्या चार वर्षांपासून धूळ खात पडून आहेत.तालुक्यातील ५२ गावांसह शहराला आगीच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अन्सारी यांनी शासन दरबारी पालिकेत अग्नीशमन दल उभारण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य सरकारने ३१ आॅगस्ट २००९ ला या प्रस्तावाला मान्यता देत या दलासाठी ६४ लाख रुपयांचे अनुदान दिले. पालिकेचे १६ लाख असे एकूण ८० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. यामध्ये वाहनासाठी २८ लाख तर कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी ३६ लाख ८६ हजार रुपये खर्च करण्यात आले. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष गणेश कुमावत यांनी पाठपुरावा करून अग्नीशमन दलासाठी लागणारे वाहन यंत्रसामुग्रीसह उपलब्ध करून दिले. मात्र पालिकेला या दलासाठी लागणाºया कर्मचारी भरतीचे अधिकार दिले नसल्याने ३ रोजंदारी कर्मचाºयांची भरती करून हा विभाग चालविला जात आहे. मागील पाच वर्षांपासून नगरपालिका संचालनालयाकडून कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने अप्रशिक्षित कर्मचाºयांना हा विभाग सांभाळावा लागत आहे. या विभागासाठी एकूण ६ पदे मंजूर झालेली आहेत. यामध्ये अग्नीशमन अधिकारी १, चालक १, फायरमन ४ चा समावेश आहे. भरतीला हिरवा कंदील मिळाल्यास पालिकेला प्रशिक्षित कर्मचारी मिळतील. तसेच तालुक्यासह शहरात आगीच्या घटना घडल्यास नियंत्रण मिळविणे सोपे जाईल. शहरातील जिनिंग व्यवसाय, कापड मार्केट पाहता कायमस्वरुपी भरतीसाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी या संदर्र्भात शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
अग्नीशमन दलाचा डोलारा हंगामी कर्मचा-यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:27 AM