लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सृष्टीची निर्मिती आदिमाया आदिशक्तीच्या विविध रुपाचे दर्शन रविवारी सायंकाळी अग्रवाल समाजबांधवांना घडले. ७० महिला व तरुणींनी एकत्र येऊन नृत्यातून ‘शक्तीचे अनंतरूप’ दाखविले. कैलास पर्वतावर शिव-पार्वतीची आराधना पाहून सारेजण भारावले होते.प्रसंग होता, छत्रपती महाराजा अग्रसेन जयंतीच्या निमित्ताने अग्रवाल सभेच्या वतीने आयोजित ‘अग्रमहोत्सवा’चा. सिडको टाऊन सेंटर येथील अग्रवाल भवन येथे या महोत्सवाचा पहिला दिवस ‘नृत्यनाटिकेने’ गाजविला. या महोत्सवाचे उद्घाटन मध्यप्रदेशातील रेवा शहराच्या महापौर ममता गुप्ता यांच्या हस्ते झाले. रंगमंचावर कैलास पर्वताचा देखावा साकारण्यात आला होता. शिव-पार्वतीच्या आराधनेत सर्व जण हरखून गेले होते. गणेशवंदनेने ‘शक्तीचे अनंतरूप’ या नृत्यनाटिकेला सुरुवात झाली. नवदुर्गा, महालक्ष्मी, तुळजाभवानी, सरस्वती, कालिकामाता, असे आदिशक्तींची विविध रुपे नृत्यनाटिकेतून साकारली जात होती. आदिशक्तीसमोर प्रत्येक जण नतमस्तक झाला. शिवतांडवही तेवढ्याच ताकदीने सादर करून कलाकारांनी सर्वांच्या टाळ्यांची दाद मिळविली.‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’ या गीतावरील नृत्यानेही सर्वांचे मन मोहून घेतले. नऊवारी साडी परिधान करून आलेल्या महिलांनी ‘आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला.... गोंधळ मांडला भवानी आई गोंधळाला ये...’ असा गोंधळ प्रकार सादर केला. गरब्याने या नृत्यनाटिकेचा समारोप झाला. आदिशक्तीच्या भक्तीत सारेजण तल्लीन झाले होते. दिग्दर्शन सुनील शर्मा यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी अंजली धनोरकर, भाजपच्या जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनीषा भंसाली यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका, आनंद भारुका, विशाल लदनिया, जगदीश अग्रवाल, अशोक अग्रवाल, निर्मला अग्रवाल यांच्यासह अग्रवाल महिला समिती, अग्रवाल युवा मंच व अग्रवाल बहुबेटी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
आदिमाया आदिशक्तीचे अग्रमहोत्सवात दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:53 AM