विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांची समकक्षांशी चर्चा
काठमांडू : भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला व त्यांचे नेपाळचे समकक्ष भरत राज पौडयाल यांनी गुरुवारी चर्चा केली असून, भारत-नेपाळ सहकार्य वाढविण्याच्या दिशेने काम करण्यावर सहमती झाली आहे.
पौडयाल यांच्या निमंत्रणावरून शृंगला हे नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर गुरुवारी सकाळी दाखल झाले असून, त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. काठमांडूतील भारतीय दूतावासाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, दोहोंत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत त्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला व दोहोंच्याही हिताच्या मुद्यांवर चर्चा केली. द्विपक्षीय प्रकल्प व पुढील कामाच्या प्रगतीवरही समाधान व्यक्त करण्यात आले. दोन्ही देशातील सहकार्य वाढविण्यावरही यावेळी सहमती झाली.
शृंगला यांनी पत्रकारांना सांगितले की, मी येथे यापूर्वीच येऊ इच्छित होतो. परंतु, कोरोनाच्या उद्रेकामुळे येऊ शकलो नाही. मी काठमांडूमध्ये यापूर्वीही आलेलो आहे. परंतु, विदेश सचिव म्हणून हा पहिलाच दौरा आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत आहेत. हे संबंध आणखी प्रगल्भ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझी पहिली बैठक नेपाळच्या विदेश सचिवांबरोबर आहे. त्यानंतर विदेश मंत्री प्रदीप ग्यावली यांचीही मी भेट घेणार आहे. काठमांडूमध्ये मी इतर मान्यवरांशीही चर्चा करणार आहे.
नेपाळच्या विदेश मंत्रालयाने या आठवड्यात एक निवेदन जारी करून म्हटले होते की, दोन्ही शेजारी देशातील उच्चस्तरीय चर्चा सुरूच राहील. शृंगला हे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली व राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्याशीही चर्चा करणार आहेत. शुक्रवारी ते काठमांडूस्थित हाॅटेलमध्ये भारत-नेपाळ संबंधांवर व्याख्यान देणार आहेत. तसेच गोरखामध्ये भारताच्या मदतीतून तयार करण्यात आलेल्या तीन शाळांची पाहणी करतील. तसेच ते नेपाळच्या सरकारला कोरोनाच्या मुकाबल्यासाठी दिली जाणारी सामग्रीही सोपविणार आहेत.
वर्ष २०१५ मधील भूकंपाचे केंद्र गोरखामध्ये ५० हजार घराच्या उभारणीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेले आहे. त्यातील ४० हजार घरांची उभारणी पूर्ण झाली आहे. शृंगला हे तिबेट सीमेवरील मनंग जिल्ह्यातही जाणार आहेत. शृंगला हे भारतात परतल्यानंतर काही कालावधीतच चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगे नेपाळच्या दौऱ्यावर येत आहेत. ते रविवारी चार दिवसाच्या दौऱ्यावर येतील, अशी शक्यता आहे.
..........
पाकमधून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात मराठवाडा,तेलंगणात येणार
नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यात शोध घेणार : बालपणीच्या आठवणी जाग्या होणार का?
इंदूर (मध्य प्रदेश) : पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली बहुचर्चित मूक-बधिर युवती गीता आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी मराठवाडा व त्याला लागून असलेल्या तेलंगणाच्या भागात येणार आहे. आठवडाभराचा तिचा हा शोध दौरा २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय व जनकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, दिव्यांगांच्या मदतीसाठी चालविल्या जात असलेल्या आनंद सर्व्हिस सोसायटीकडून सध्या गीताची देखभाल केली जात आहे. या स्वयंसेवी संघटनेकडे तिच्या माता-पित्याचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संघटनेचे संचालक व सांकेतिक भाषा तज्ज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांनी सांगितले की, गीताशी सांकेतिक भाषेत बोलणीच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर असे लक्षात आले आहे की, गीता ही मूळची मराठवाडा भाग व त्याला लागून असलेल्या तेलंगणाची असावी. तेथून दोन दशकापूर्वी ती आपल्या कुटुंबापासून दूर गेली. तिच्याशी झालेल्या सांकेतिक भाषेतील चर्चेचे अनेक दुवे आम्ही जोडले आहेत व तिच्या कुटुंबीयांच्या शोधासाठी आम्ही तिला २ डिसेंबरपासून रवाना होत आहोत.
आम्ही तिला नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांच्या परिसरात घेऊन जाणार आहोत. बालपणीच्या तिच्या आठवणीनुसार, तिचे म्हणणे आहे की, तिच्या गावाजवळ एक रेल्वेस्थानक आहे व गावाजवळ नदीच्या किनाऱ्यावर देवीचे मंदिर आहे. तिला मराठवाड्याजवळील तेलंगणा भागातही नेणार आहोत. या सर्वांसाठी एक आठवड्याचा वेळ लागणार आहे. या काळात रस्ते तसेच रेल्वेमार्गे प्रवास करण्यात येईल. या कालावधीत मध्य प्रदेशच्या महिला पोलिसांचे पथक तिच्याबरोबर असेल. तसेच रस्त्यात स्थानिक पोलिसांची मदतही घेतली जाईल.
मागील पाच वर्षांत देशाच्या विविध भागातील २० कुटुंबे गीताला आपली मुलगी म्हणत आहेत. परंतु सरकारी तपासात यातील कोणत्याही कुटुंबाचा तिच्यावरील दावा सिद्ध होऊ शकलेला नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गीताचे वय सध्या ३० च्या आसपास असल्याचा अंदाज आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सीमापार गेली होती. ही घटना २० वर्षांपूर्वीची आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी गीताला लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये एकटी बसलेली पाहिली होती.
तत्कालीन विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांनी तिला २६ ऑक्टोबर २०१५ रोजी भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला इंदूरमधील एका स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले होते.
..........
तुर्कीच्या २०१६ च्या सत्तापालटाबाबत अनेक सैन्य अधिकारी व नागरिकांना जन्मठेप
अंकारा : तुर्कीमध्ये २०१६ च्या सत्तापालटाचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी आढळलेल्या अनेक सैन्य अधिकाऱ्यांना तसेच नागरिकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
अकिंसी विमानतळावर याबाबत मागील तीन वर्षांपासून ४७५ लोकांवर खटला सुरू होता. यात जनरल व लढाऊ विमानांचे पायलटही सामील आहेत. सत्तापालटाचा प्रयत्न करणे तसेच संसद भवनासह अनेक सरकारी इमारतींवर बॉम्बवर्षाव करण्याचा आदेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अमेरिकेचे मौलाना फतुल्ला गुलेन यांच्या नेतृत्वातील एका नेटवर्कच्या संशयित सदस्यांच्या विरोधात सुरू असलेल्या दोन मुख्य खटल्यात हा मोठा खटला आहे. मौलाना फतुल्ला गुलेन यांनी सत्तापालटाच्या प्रयत्नाचा कट रचला, असा आरोप आहे. हा प्रयत्न अयशस्वी झाला.
तथापि, यातील सहभागाचा त्यांनी इन्कार केला आहे. सत्तापालटाच्या प्रयत्नामुळे २२० जणांचे बळी गेले व हजारो लोक जखमी झाले. यावेळी सत्तापालटायाचा प्रयत्न करणारे ३० षड्यंत्रकारीही ठार झाले.
चार जणांवर देशाविरोधात गुन्हा, राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न व इतर प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली. किमान २१ प्रतिवादींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात अनेक पायलट व कमांडर सामील आहेत. इतर प्रतिवादींना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. गुलेन व इतर चार जणांच्या आरोपांवर स्वतंत्र खटला चालणार आहे.
सरकारी पक्षाने आरोप केला आहे की, सत्तापालटाच्या षड्यंत्रकाऱ्यांनी अकिंसी विमानतळाचा वापर मुख्यालय म्हणून केला. त्या रात्री तुर्कीचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल हुलिसी अकार व अन्य कमांडरांना अनेक तास विमानतळावर बंधक बनवून ठेवले होते. हुलिसी हे सध्या देशाचे संरक्षणमंत्री आहेत. सत्तापालटानंतर खटल्याची सुरुवात १ ऑगस्ट २०१७ रोजी झाली होती. त्याअंतर्गत सुमारे ७७ हजार लोकांना जेलमध्ये टाकण्यात आले होते व एक लाख ३० हजार लोकांना सरकारी नोकरीवरून काढण्यात आले होते.
.........
भाजप खासदारांवर विद्यापीठात बळजबरीने घुसल्याचा गुन्हा दाखल
हैदराबाद : कर्नाटकचे भाजप खासदार व पक्षाच्या युवा आघाडीचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या व त्यांचे समर्थक हे विनापरवानगी व बळजबरीने उस्मानिया विद्यापीठात घुसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहिदांना आदरांजली देण्यासाठी त्यांनी बॅरिकेड्स हटविल्याचाही आरोप आहे. मंगळवारी ही घटना घडली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर हैदराबाद महानगर पोलीस अधिनियमच्या संबंधित तरतुदी व कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भाजप नेता विद्यापीठाच्या परिसरात विना परवानगी व बॅरिकेड्स हटवून जबरदस्तीने घुसले तसेच तेथे सभाही घेतली.
भाजप खासदाराने त्यावेळी आरोप केला होता की, पोलिसांना त्यांना रोखले. तथापि, पोलिसांनी स्पष्ट केले की आम्ही असे काहीही केले नाही. त्यांचा पोलिसांशी कसलाही संघर्ष झाला नाही. खासदार आपल्या समर्थकांसह परिसरात आले होते व शांततापूर्ण पद्धतीने त्यांनी सभा घेतली होती. स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी झालेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू हे विद्यापीठच होते.
.........
फ्लायओव्हर घोटाळ्यात माजी मंत्र्याची जामीन याचिका फेटाळली
कोची : केरळमधील कोचीस्थित सतर्कता न्यायालयाने माजी मंत्री व्ही. के. इब्राहिम कुंजू यांची जामीन याचिका गुरुवारी फेटाळली. त्यांना सतर्कता व भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्यूरोने फ्लायओव्हर घोटाळ्यात गजाआड केले आहे.
मुवत्तुपुझा सतर्कता न्यायालयाने व्हीएसीबीच्या कुंजू यांना ताब्यात देण्याची मागणीही फेटाळून लावली. परंतु, त्यांना आजारी माजी मंत्र्याची खासगी रुग्णालयात दिवसातील काही तास चौकशी करण्याची परवानगी दिली. कुंजू यांच्यावर कोचीतील एका रुग्णालयात कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. कुंजू यांची चौकशी करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी तसेच डॉक्टरांच्या निगराणीत चौकशी करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. प्रत्येक एक तास चौकशीनंतर त्यांना १५ मिनिटे विश्रांती द्यावी व त्यांच्यावरील उपचार कोणत्याही प्रकारे प्रभावित होऊ नयेत, असे म्हटले आहे. त्यांची सोमवारी चौकशी केली जाऊ शकते.
तत्पूर्वी, न्यायालयाने गठित केलेल्या मेडिकल बोर्डाच्या अहवालाचा आढावा घेतला. यात म्हटले आहे की, कुंजू यांची तब्येत पाहता त्यांची कोठडी आणखी वाढविली जाऊ शकत नाही. आययूएमएलचे आमदार कुंजू यांना मागील आठवड्यात खासगी रुग्णालयात अटक करण्यात आली.
.......................
नेमका आरोप कोणता?
पलावरिवत्तो फ्लायओव्हर घोटाळ्यात तपास यंत्रणेने त्यांची यापूर्वी अनेकदा चौकशी केलेली आहे. कुंजू यांनी फ्लायओव्हर उभारणाऱ्या कंपनीला व्याजमुक्त निधी उभा करण्यास मंजुरी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे. या फ्लायओव्हरचे उद्घाटन २०१६ मध्ये झाले होते व त्यानंतर एका वर्षातच त्याला भेगा पडल्या होत्या.
.........
आजम खान, पुत्राचा जामीन फेटाळला
अलाहाबाद : सपाचे ज्येष्ठ नेते मो. आजम खान व त्यांचा अपात्र ठरविण्यात आलेला आमदार पुत्र मो. अब्दुल्ला आजम खान फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असून, दोहोंचा जमीन अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यांना जामीन मंजूर करणे समाजहिताचे नाही. बाहेर आल्यावर ते पुराव्यांवर प्रभाव टाकू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
तीन महिला, बालकाचा अपघातात मृत्यू
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) : टँकर व ऑटोरिक्षाच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला व अन्य एक जण जखमी झाला. मृतात तीन महिला व एका बालकाचा समावेश आहे. सिमेंटने भरलेल्या टँकरने रिक्षाला जोराची धडक दिली होती. त्यात रिक्षा उलटून दबला होता. पोलिसांनी टँकर व झाड हटवून रिक्षा बाहेर काढला.
कोरोना रुग्णाने केली आत्महत्या
रायपूर : ४९ वर्षीय कोरोना रुग्ण पुरुषाने एम्स, रायपूरमध्ये रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. जंजगीर-चंपा जिल्ह्यातील हा रुग्ण २२ नोव्हेंबरपासून रुग्णालयात दाखल झालेला होता. डॉक्टर त्याला तपासून गेल्यानंतर तो स्नानगृहात गेला व तेथील खिडकीतून त्याने खाली उडी घेतली, असे सांगितले जात आहे. १२ ऑगस्ट रोजीही येथे एका रुग्णाने आत्महत्या केली होती.
कॉन्स्टेबलच्या गोळीबारात महिला जखमी
नवी दिल्ली : जमावाने घेरल्यानंतर व मारहाण केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाली. कार पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणाबाबत चौकशी करण्यासाठी हा तेथे गेला होता. त्याने चालविलेली गोळी महिलेच्या पायाच्या अंगठ्याला लागली.
राजस्थान पोलिसांवर न्यायालय नाराज
नवी दिल्ली : दिल्लीतून २६ वर्षीय महिलेला जबरदस्ती नेण्याच्या राजस्थान पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ही कारवाई पूर्णपणे अनुचित आहे व राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
.......
लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या प्रयत्नात भाजपशासित राज्ये
२०२१ मध्ये राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत बनवणार मुद्दा
नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशनंतर भाजपशासित इतर राज्येही लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा बनवण्याच्या तयारीत आहेत. मध्य प्रदेशने याबाबत कायद्याचा मसुदा तयार केला तर हरयाणा, कर्नाटकमध्येही कायद्याची तयारी सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम व इतर राज्यात भाजप हा मुद्दा मोठा बनवू शकते.
भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, लव्ह जिहाद गंभीर प्रश्न आहे. अनेक भगिनी व माता त्याच्या बळी ठरल्या आहेत. हा राज्यांचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी त्याविरोधात कारवाई करायला हवी. काही राज्य सरकारे लव्ह जिहादविरोधात काम करीत आहेत व पुढेही लव्ह जिहादविरोधात कारवाई सुरूच राहील.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य करून राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संगतीत आल्यावर लव्ह जिहादवर शिवसेनेची भूमिका नरमली आहे.
याबाबत भाजपच्या एका केंद्रीय पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना म्हटले की, हा एक मोठा मुद्दा आहे. भाजप बहिणी, मुलींच्या सन्मान व स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी नेहमी बांधील आहे. भाजपशासित राज्ये किंवा गैर भाजपशासित राज्ये असतील तेथे भगिनी-मुलींना फसवण्यात आल्याचे दिसल्यास निश्चितपणे भाजप त्यांच्या पाठीशी उभा ठाकेल.
हा पदाधिकारी म्हणाला की, या मुद्यातून निश्चितच राजकीय लाभ होऊ शकतो. भाजपसाठी हे राजकारण नाही तर समाजाबद्दलची जबाबदारी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा बनवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, ‘योग्य वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील.’
नितीश सरकारवरही दबाब
लव्ह जिहादवर कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर दबाब वाढताना दिसतो आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बिहारमध्ये लव्ह जिहादबाबत कायदा बनवावा, असे आव्हान भाजपसमोर ठेवले तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी नितीश कुमार सरकारला लव्ह जिहादविरोधात कायदा बनवावा, असे आवाहन केले. पुढील वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व केंद्रशासित प्रदेश पुड्डुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातील फक्त आसाममध्ये भाजपा आपले खाते उघडू शकला आहे.
----------------------