औरंगाबाद : नवउद्योजकांना घडविण्यासाठी तसेच स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी ‘मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल’ने (मॅजिक) ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरसोबत (माकिआ) शनिवारी सामंजस्य करार केला आहे. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र चेंबरच्या नवीन कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यादरम्यान या सामंजस्य करार झाला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, या कराराअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवउद्योजक घडवण्यासाठी, नवोपक्रमाला चालना देण्यासाठी, महिला उद्योजिका घडवण्यासाठी तसेच ‘एमएसएमई’च्या सक्षमीकरणासाठी या दोन्ही संस्था काम करणार आहेत. ‘मॅजिक’च्या माध्यमातून मराठवाडा विभागात नवउद्योजकांसाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे औरंगाबाद आणि प्रदेशात स्टार्टअपसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार आहे.
‘मॅजिक’ ही संस्था गेल्या ७ वर्षांपासून नावीन्यपूर्ण नवउद्योजकतेसाठी आणि सर्वसमावेशक स्टार्टअप इकोसिस्टीम तयार करण्याचे काम करत असल्याचे मॅजिकचे संचालक आशिष गर्दे म्हणाले. अल्पावधीतच देशातील अग्रगण्य इनक्युबेशन सेंटरमध्ये मॅजिकचा समावेश झाला असून राज्यातील टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये नवउद्योजक तयार करण्यासाठी या सामंजस्य कराराचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
नुकत्याच जाहीर झालेल्या देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात स्टार्टअप्सच्या संख्येत महाराष्ट्र हा देशात अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले असून देशातील एकूण स्टार्टअप्सच्या २० टक्के एवढे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये मुंबई, पुणेखालोखाल औरंगाबाद शहरामधून अनेक नवउद्योजक समोर येत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांऐवजी नोकरी उपलब्ध करून देणारे उद्योजक घडवण्याकरिता आणि तरुणांना नोकरीतील ‘पॅकेज’ऐवजी व्यवसायातील ‘प्रॉफिट’कडे नेण्यासाठी ही संस्था काम करते.
या सामंजस्य कराराप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, मीनल मोहाडीकर, शंतनू भडकमकर, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष रवींद्र मंगवे, करूनकार शेट्टी, शुभांगी तिरोडकर, माजी उपाध्यक्ष समीर दुधगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.