औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ हजार ८३३ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीजजोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी १३१ कोटी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत यापुढे एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत.
वीजपुरवठा खंडित होण्याच्या नेहमीच्या कटकटीतून ‘एचव्हीडीएस’ प्रणालीमुळे शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १३१ कोटी १६ लाख रुपयांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या रोहित्रांची खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुुख्यालयाकडून यापूर्वीच सुरू केली आहे. यानुसार जिल्ह्यात १० केव्हीए क्षमतेची ९ हजार ३०२ रोहित्रे, १६ केव्हीए क्षमतेची १६४ रोहित्रे आणि २५ केव्हीए क्षमतेची १८ रोहित्रे बसविण्यात येणार आहेत.
उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदेसध्या ६५ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांना वीजपुरवठा केला जातो. नवीन उच्चदाब प्रणालीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी तसेच वीज हानीसुद्धा कमी होणार आहे. या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करता येणार नाही.नव्या प्रणालीवर एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत तीनच कृषिपंपांना वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळेल.
यामध्ये ज्या शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यासाठी ०.४ कि.मी.पेक्षा अधिक उच्चदाब वाहिनी टाकावी लागणार आहे किंवा जोडणीसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लागणार आहे, अशा शेतकऱ्यांना ‘आॅफ ग्रीड सोलर सिस्टीम’द्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.