सिल्लोड: कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे पोळा सण साजरा केला. पोळा सणानिमित्त त्यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांच्या शेतातील बैलजोडींचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले. यावेळी त्यांनी पोळ्याचा शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
अधिवेशन संपल्यानंतर शुक्रवारी सकाळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे सिल्लोडला आगमन झाले. यावेळी त्यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेवून संवाद साधला. त्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्या त्यांच्या शेतातील बैल जोडीचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले. त्यानंतर सिल्लोड व परिसरातील विविध ठिकाणी पोळा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी विभागात आमूलाग्र बदल करणार असल्याचे ते म्हणाले. काळानुसार कृषी धोरणात बदल करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे ठोस उपाययोजना राबविणार असून शेतकऱ्यांनी देखील आता तज्ञांच्या सल्ला घेवून आधुनिक शेतीचा अवलंब केला पाहिजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांची कोणी फसवणूक करीत असेल तर ती खपून घेणार नाही. बोगस बियाणे प्रकरणातील दोषींना जेलची हवा खावी लागेल असा असा इशारा मंत्री सत्तार यांनी यावेळी दिला.