औरंगाबाद : ‘राज्यात शिक्षणमंत्री म्हणून काही वर्षे काम केले. त्याच्यापेक्षा अवघड दुसरे काम नाही. शिक्षकांच्या संघटना, त्यांचे नेते विविध मागण्या मांडतात. त्यावर शिक्षणमंत्री खात्याचे अपुरे बजेट पाहून, हो किंवा नाही, असे काहीच बोलत नाहीत. हे बघून मंत्री आपल्या वर्गातील कच्चा विद्यार्थी असल्याचे समजून ते पुन्हा-पुन्हा समजावून सांगतात. त्यामुळे मंत्रिमंडळ बदलावेळी शंकरराव चव्हाण यांना सांगितले, मला घेणार असाल, तर शिक्षण खात्यातून काढा आणि शेती खात्यात टाका. त्यांनी कृषी खाते दिले आणि माझ्यादृष्टीने ती सुटका झाली’, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले.
एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात सोमवारी आ. विक्रम काळे यांच्या निधीतून मराठवाड्यातील ३३०० शाळांना १०.३१ कोटींच्या निधीतून ११.६१ लाख पुस्तके वाटपाचा शुभारंभ खा. शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आला. यापैकी जिल्ह्यात ४८७ शाळांत १ कोटी २७ लाख रुपयांची पुस्तके दिली जाणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात ६ शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सोनाली चव्हाण यांचे शिक्षकपती विनोद यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने, त्यांना ५० हजार रुपयांच्या अनुदानाचा चेक खा. शरद पवार यांच्याहस्ते वितरित करण्यात आला.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, माजी आ. अमरसिंह पंडित, डॉ. कल्याण काळे, कैलास पाटील, संजय दौंड, अनिल साबळे, डाॅ. बाळासाहेब पवार, अनिल साबळे, एम. के. देशमुख, जयश्री चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आ. विक्रम काळे, तर संचालन रमेश ठाकूर यांनी केले. आभार प्रदीप विखे यांनी मानले.
...अर्थमंत्र्यांना झोप लागणार नाहीभाषणात आ. विक्रम काळेंनी इतक्या मागण्या केल्या, की माझी खात्री आहे, आजकाही अर्थमंत्र्यांना चांगली झोप लागणार नाही. मात्र, ज्ञानवृद्धी, वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी त्यांनी निधीचे केलेले आदर्श नियोजन व पुस्तक वाटण्याचा काळे यांचा उपक्रम स्तुत्य असल्याचे खा. शरद पवार म्हणाले. तसेच विक्रम काळेंनी फोन करून, १५ मिनिटांचा वेळ मागितला होता. प्रत्यक्षात तासाभरापेक्षा कार्यक्रम लांबल्याने, शिक्षकांच्या प्रतिनिधीचे गणित इतके कच्चे कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.