औरंगाबाद : खेळतांना लहान मुलांनी फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचे नेहमीच ऐकण्यात असते. पण एका ३३ वर्षीय व्यक्तीने लांबलचक टूथब्रशच गिळला. पोटात वेदना सुरू झाल्याने त्याने घाटीत धाव घेतली. तपासणीत पोटात चक्क टूथब्रश पाहून डॉक्टरही चकीत झाले. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा ब्रश काढला आणि रुग्णाला वेदनामुक्त केले.
शहरातील रविवार बाजार परिसरातील हा रुग्ण आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दात घासताना त्याने अख्खा टूथब्रशच गिळला. पोट दुखू लागल्याने सदर रुग्ण सकाळी ११ वाजता घाटीतील अपघात विभागात दाखल झाला. रुग्णाची अवस्था पाहून तातडीने उपचार सुरु करण्यात आले. उपचारासाठी रुग्णाचा सीटी स्कन काढण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या पोटात संपूर्ण टूथब्रश असल्याचे आढळले. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न त्यांनाही पडला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हा टूशब्रश रुग्णाच्या पोटातून काढला.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-६ चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. सुकन्या विंचूरकर , डॉ. गौरव भावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूंडे, डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. या रुग्णाची प्रकृती चांगली असून कक्ष क्रमांक १८ मध्ये उपचार सुरु असल्याचे डॉ. सरोजिनी जाधव यांनी सांगितले.
यापूर्वी काढला चमचाहीमनोरुग्ण अशाप्रकारे वस्तू गिळत असतात. एका रुग्णाच्या पोटातून यापूर्वी चमचा काढला होता. या रुग्णाने ब्रश का गिळला, हे समजू शकले नाही, असे डॉ. जुनेद एम. शेख म्हणाले.
त्याचा ब्रश , त्याला परतशस्त्रक्रिया करून पोटातून काढलेला टूथब्रश सांभाळून ठेवा बरं, अशा सूचना स्टाफला डॉक्टरांनी हसतच दिल्या. स्टाफने तो ब्रश त्या रुग्णाला परत केला.