छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणूक तोंडावर भाजपला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. भाजपचे अतुल सावे यांच्या मतदारसंघातील तीन माजी नगरसेवक, पाच मंडळ अधिकारी आणि एक जिल्हा परिषद माजी सदस्य ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. येत्या ७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असून यातील राजू शिंदे हे आज राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्या ठाकरे गटात जाण्याने अतुल सावे यांच्यासह शिंदेसेनेतील संजय शिरसाट यांना देखील धक्का मानण्यात येत आहे.
भाजपचे राजू शिंदे यांच्यासह काही माजी नगरसेवक, पाच मंडळ अधिकारी एक जिल्हा परिषद चे माजी सदस्य ठाकरे गटात जाण्याचे तयारीत आहेत. यामुळे भाजपा अॅक्शन मोडवर आला असून आज सकाळपासून मंत्री अतुल सावे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी राजू शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्यांची मनधरणी करून त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी राजीनामा देऊ नये, असे देखील सांगितले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी देखील शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती केल्याची माहिती आहे. परंतु शिंदे आपल्या शब्दावर ठाम आहेत. उशीर झाला, आता चर्चा करून काय फायदा, अशी टिप्पणी शिंदे यांनी केली.
संजय शिरसाट यांना आव्हानदरम्यान, भाजपच्या एका गटांमध्ये या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिंदे यांचा प्रभाव पूर्व मतदारसंघात आहे. येथे भाजपाचे अतुल सावे आमदार आहेत. पण शिंदे यांचा पश्चिम मतदारसंघावर दावा आहे. येथे शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट आहेत. आता शिरसाट यांच्यासमोर शिंदे यांचे आव्हान कसे असणार यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, मागील विधानसभेत राजू शिंदे अपक्ष पश्चिम मतदार संघात उभे होते. त्यांचा शिरसाट यांनी पराभव केला होता.
गेल्या निवडणुकीत जागा दाखवून दिली - संजय शिरसाटआमदार संजय शिरसाठ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, राजू शिंदे ठाकरे गटात विधानसभा उमेदवारीसाठी जात आहेत. ते विधानसभा लढणार असले तरी माझ्यासमोर त्यांचं कुठलंही कडवट आव्हान नाहीये. मी त्यांना गेल्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिलेली आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.