औरंगाबाद : अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात गोरगरीब, दिनदुबळ्या लोकांना सोयी-सुविधा, रस्ते, पाणी अशा सर्व सुविधा तर उपलब्ध केल्याच, परंतु त्यापुढेही जाऊन अहिल्यादेवी यांनी आयुष्यभर अन्नदानाचे काम केले, असे गौरवोद्गार राज्याचे माजी पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी काढले.
मुकुंदवाडीतील अहिल्यादेवी होळकर स्मारक ठिकाणी आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त गोरगरिबांना अन्नधान्य वाटप व स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके वाटपप्रसंगी ते बोलत होते. जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद बनसोडे, भानुदास कोरे, सुरेश ठोंबरे, हौसाबाई काटकर, गयाबाई सावळे, मुंजाजी जगाडे, शालिनी पाटील, काशिनाथ आरगडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. जगन्नाथ सोनाळकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत काटकर यांनी आभार प्रदर्शन केले. श्रीहरी पाटील, तान्हाजी पांढरे, कडूबा मिसाळ, पांडुरंग कांगणे, किरण भंडे, सिंधुबाई नाचन, अभिषेक कोरे, अविनाश गीते, मनोज नरोटे, दादाराव नवल यांची उपस्थिती होती.