वैभवशाली वास्तूकलेचा नमुना : हेमाडपंथी मंदिर प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध
औरंगाबाद : राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, विहिरी, बारवांचा जीर्णोद्धार केला होता. त्यातील एक औरंगाबाद शहराच्या दक्षिणेस सातारा गावातील खंडोबाचे हेमाडपंथी मंदिर होय. यामुळे हे पुरातन मंदिर आजही दिमाखात उभे असून प्राचीन वैभवशाली वास्तूकलेचा साक्षीदार बनले आहे.
सातारा गावात डोंगर पायथ्याशी असलेले खंडोबाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर एकाच दगडात निर्माण केलेले आहे. मात्र, हे मंदिर अर्धवट अवस्थेत होते. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून १७६६ मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा गाभाऱ्यापर्यंतचा भाग दगडी व त्यावरील कळसापर्यंतचा भाग वीटांनी बांधला. यामुळे भक्तांना आजही हे अखंड मंदिर पाहण्यास मिळते ते फक्त अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टीमुळेच.
या पूर्वमुखी मंदिरात जाण्यासाठी पूर्व बाजूने मोठे प्रवेशद्वार आहे. १५ पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य प्रवेशदरवाजा लागतो. त्यावर नगारखाना आहे. आत गेल्यावर उत्तरबाजूस दीपमाळ आहे. आत गेल्यावर दगडी चौथरा लागतो. पूर्वी येथे बारव होती. त्यात उतरून भाविक पाय धूत असत व नंतर मंदिरात दर्शनासाठी जात. मात्र, बारवेतील दगड गुळगुळीत झाले होते. त्यावरून घसरून भाविक पडत होते. यामुळे ती बारव बुजविण्यात आली. तेथे आता चौथरा बांधला आहे. गाभाऱ्यात प्रवेश करताना बाहेरील बाजूस दशावतार, कृष्ण लीला व सूर्य यांची शिल्पे लक्ष वेधून घेतात. गाभाऱ्यात अश्वारूढ खंडोबारायाचे रूप पाहून मन प्रसन्न व शांत होते. येथेच तब्बल ८ फूट उंचीची प्राचीन दुधारी खंडा आहे. याचे दर्शन घेऊन भाविक बाहेर पडतात. तेव्हा दक्षिण बाजूचा कडेपठार दिसतो. प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात चंपाषष्ठीला यात्रा भरते. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे खंडोबा देवाच्या दर्शनाला येत असतात.