लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : बियाणांच्या अनुवांशिक उत्पादनाची क्षमता अधिक असताना पारंपरिक पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे कृषी विभागाने यंदा ‘उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी’ हा उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमात शेतकऱ्यांचा गट करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. उत्पादन वाढविण्यासाठी हा उपक्रम असून, रोहिणी नक्षत्रापासून मृग नक्षत्राच्या प्रारंभापर्यंत या अभियानात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्या बियाणांची निवड करावी, कोणते बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते, खत आणि फवारणी औषधांचा कसा वापर करावा, मशागतीनंतर पेरणी कशी करावी, या सर्व बाबींचे प्रशिक्षण या अभियानात दिले जाणार आहे. प्रत्येक गावात २५ शेतकऱ्यांचा गट तयार करून कृषी विभागाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. पिकांच्या उत्पादन वाढीचे तंत्र या प्रशिक्षणात शिकविले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषितज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार असून, नव्या पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. पारंपरिक शेतीमध्ये खर्चही निघत नाही. उत्पादन क्षमता चांगली असतानाही तो खर्च निघत नाही. जेवढे पीककर्ज आहे, त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे म्हणून हा उपक्रम कृषी विभागाने राबवायला सुरुवात केली आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रयोगानंतर अनुदानही दिले जाणार आहे.
‘उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी’ उपक्रमात कृषी सहायकांना उद्दिष्ट
By admin | Published: May 20, 2017 12:42 AM