औरंगाबाद : जालना रोडवरील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयासाठी सोमवार (दि.३०) हा अखेरचा दिवस ठरला. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आॅनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल, अथवा एअर इंडियाचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बुकिंग काऊंटर गाठावे लागेल.
एअर इंडिया कंपनीने देशभरातील विविध शहरांतील बुकिंग काऊंटर बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. यामध्ये औरंगाबाद शहरातील बुकिंग काऊंटरही बंद करण्याचा निर्णय झाला. आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे. त्याद्वारे अवघ्या काही वेळेत विमानाचे तिकीट काढणे शक्य झाले आहे, त्यामुळे एअर इंडियाचे कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाने प्रवाशांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे.
प्रथमच विमान प्रवास करणारे प्रवासी एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन आवर्जून चौकशी करीत असत; परंतु आता यापुढे एअर इंडियाचे विमानतळावरील काऊंटर, संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल. औरंगाबाद एअर इंडियाच्या कार्यालयातील बुकिंग काऊंटरची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच विमानतळावर नियुक्त करण्यात आले. याविषयी एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर अजय भोळे म्हणाले, वरिष्ठाकडून आदेश प्राप्त झाले. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कामकाज चालले.