औरंगाबाद : एकीकडे शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीने महाराष्ट्र हादरला असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांबाबतही संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने मराठवाड्यातील शिवसेनेच्या तीनही खासदारांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण शिवसेना आणि ‘मातोश्री’सोबतच असल्याचे सांगितले.
आजन्म शिवसेनेसोबतच राहणार : संजय जाधवमाझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला पक्षाने खूप काही दिले आहे. त्यामुळे आपण आजन्म शिवसेनेसोबतच राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना पक्षाचे अनेक आमदार व मंत्र्यांनी पक्षविरोधात बंड केले आहे. या अनुषंगाने गुरुवारी परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी चालविले. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना खा. जाधव म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने खूप काही दिले आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आज कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, याची आपणास जाण आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने आपणास काय दिले आहे, याचाच विचार मनात असतो. पक्षाने आतापर्यंत दिलेल्या संधीबद्दल मी समाधानी आहे. त्यामुळे आजन्म आपण शिवसेनेसोबतच राहणार आहोत. दुसरा कोणताही विचार मनामध्ये येणार नाही. ज्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले आहे, त्या शिवसैनिकांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, यासाठीच आपण काम करीत आहोत. गुरुवारीच मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आता आपण पंढरपूरच्या वारीमध्ये जात असल्याचे जाधव म्हणाले.
आपले इमान ‘मातोश्री’च्याच चरणीउस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनीही आपले इमान हे कायम ‘मातोश्री’च्याच चरणी असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याची भूमिका गुरुवारी मांडली. शिवसेनेतील बंडाळीनंतर सोमवारी रात्रीच मुंबई गाठलेले खासदार राजेनिंबाळकर भूमिका अधिक स्पष्ट करताना म्हणाले, राजकारण शिकण्याच्या अगदी तरुणवयात असताना स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास दर्शवत २००९मध्ये आमदार म्हणून निवडून आणले. २०१४च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी आपल्यावरील प्रेम कायम ठेवले. २०१९मध्ये उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर पुन्हा विश्वास दर्शवत मोठी जबाबादारी दिली. लोकसभेची उमेदवारी देऊन खासदार म्हणून निवडून आणण्यात त्यांनी अपार मेहनत घेतली. या बाबी आपण विसरू शकत नाही. त्यामुळे ठाकरे परिवार कोणत्याही प्रसंगात असो; आपण आज त्यांच्या बाजूने आहोत. भविष्यातही ठामपणे राहू, असे खासदार राजेनिंबाळकर म्हणाले.
मी शिवसेनेसोबतच : हेमंत पाटीलशिवसेनेच्या अनेक आमदार - खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असला, तरीही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे मात्र शिवसेनेसोबतच आहेत. मी ‘मातोश्री’वर एका बैठकीत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाटील म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने बळ दिले आहे. त्यामुळे मी कदापिही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. पक्ष सोडण्याचा विचारही कधी मनात येणार नाही. मी बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असून, कायम शिवसेनेसोबतच राहीन.