छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन बँकेत ९७.४१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आ. सुभाष झांबड यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयातील अर्ज मागे घेतल्यानंतर झांबड शुक्रवारी पोलिसांसमोर शरण आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
विशेष लेखा परीक्षक सुरेश काकड यांच्या फिर्यादीवरून १८ ऑक्टोबर २०२३ रोजी याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. एफआयआरमधील आरोपानुसार, बँकेेच्या लेखा परीक्षणात नेटवर्थ रक्कम व सी. आर. ए. आर. (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक आढळून आला. ३६ कर्जदारांना ६४.६० कोटींचे असुरक्षित कर्ज वाटप केले. २३ डिसेंबर २०२२ रोजी आरबीआयला पाठवलेल्या पत्रात बँकेने ही बाब मान्य केली होती. शिवाय, बँकेच्या लेजर बुकमध्ये २००६ ते २०२३ दरम्यान ६४.६० कोटी रुपयांच्या मुदत ठेवीबाबत बनावट नोंदी केल्या. ३२.८१ कोटी बँकेची रक्कम तीन बँक खात्यांत जमा असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवून ताळेबंद तयार केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. झांबड यांच्यावर २५ डिसेंबर २०२४ रोजी २१.५६ कोटींची अफरातफर केल्याप्रकरणी चेतन भारुका यांच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल झाला.
सर्वोच्च न्यायालयातून अर्ज मागेजिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज (स्पेशल लिव्ह पिटिशन) दाखल केला. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि सुधांशू जोशी यांनी तेथे सत्र न्यायालयात जामीन अर्ज करायचा असल्याने हा अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यास न्यायालयाने परवानगी देत शरणागती पत्करल्यानंतर नियमित जामीन अर्ज सादर केल्यास संबंधित न्यायालयाने तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झांबड यांनी आयुक्तालयात शरणागती पत्करली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी त्यांना अटक केली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने झांबड यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी ठेवीदारांची न्यायालयात मोठी गर्दी होती.
या मुद्द्यांवर पोलिस कोठडी-झांबड यांच्यावर दाखल दुसऱ्या गुन्ह्यातील ३६ पैकी ५ कर्जदारांच्या फाइल्सचा शोध बाकी-आरबीआयला देण्यात आलेल्या पत्रांमधील बनावट शिक्के कोणी, कुठून तयार केले?-एमपीआयडीनुसार झांबड यांच्या संपत्तीची माहिती घेऊन जप्त करायची आहे