- उदयकुमार जैन
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीत ओबडधोबड दगड धोड्यांच्या ‘अर्थ’आधाराने जगणाऱ्या दगड विक्रेत्यांच्या संसारवेली कोमेजू लागल्या आहेत. नोटाबंदीनंतर धडपडणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे इथल्या स्टोन इकॉनॉमीला गेल्या काही दिवसांपासून घरघर लागली असून, दगड विक्रेते अर्थार्जनाचा नवा मार्ग शोधत आहेत. त्यामुळे दगडांचे वैभव लुप्त होऊ लागले आहे.
लहान मुलांना वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे दगड जमा करताना आपण नेहमी पाहतो आणि ‘फेकून दे’ म्हणून त्यांच्यावर खेकसतो. मात्र, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील रंगीबेरंगी दगड येथील अशिक्षित व बेरोजगार तरुणांचा संसार चालवितात. अजिंठा लेणीच्या निर्मितीपासूनच येथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचे हे दगड आकर्षण ठरलेले आहे. पर्यटक हेच येथील कमाईचे साधन आहे. एक दिवस हजारो रुपये देणारा, तर आठ-आठ दिवस दमडीही न मिळणारा हा दगड व्यवसाय या भागातील बेरोजगारांसाठी ‘लक्ष्मीस्वरूप’ आहे. त्यामुळे मोठ्या कमाईच्या मोहाने शिक्षणाकडे दुर्लक्ष करून अर्थार्जन करणारे अनेक जण व्यवसायातून संसार चालवीत आहेत; परंतु यंदा या व्यवसाय मंदावला आहे.
या व्यवसायाच्या मंदीची कारणे सांगताना विक्रेते म्हणाले, नोटाबंदीपासून खरा फटका बसला. त्या काळात तर एटीएममध्येही पैसे नसत. देशी-विदेशी पर्यटक दगड खरेदीकडे ढुंकूनही पाहत नव्हते. त्यानंतर परिस्थिती थोडी सुधारली; परंतु त्यात पुन्हा अनेक संकटे आलीत. या व्यवसायात कमाई भरपूर असल्याने अनेक जणांनी आले. स्पर्धा निर्माण झाली. शिवाय जळगाव, घोडसगाव, चांदवड, मनमाड, वाळूज आदी ठिकाणच्या खदाणीतून मिळणारे हे रंगीबेरंगी दगडही आता हे खदानमालक आम्हाला न विकता थेट मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे पाहिजे तसा दगड कमी किंमतीत मिळत नाही.
पूर्वी विदेशी पर्यटक चौकशी न करताच या मायाजालात अडकून हवी ती रक्कम मोजून दगड खरेदी करायचे; पण आता तेही हुशार झाल्याने खरेदी करताना कंजूषी करतात, याचाही फटका आम्हाला बसतो, असे दगड विक्रेते जयेश बत्तीसे, रमेश पाटील, शेख अकील, शेख रफिक शेख जाफर, राजू कापसे, युवराज दामोदर, प्रकाश हातोळे, शकूलाल लव्हाळे, शेख रफिक शेख कादर, शे. रफिक शे. मुसा, शेख हसन शेख फरीद आदींनी आदींनी सांगितले.
दगडांनी घडविले जगाचे दर्शनअजिंठा लेणी भागातील अनेक तरुण दगडाच्या व्यवसायानिमित्त गोवा, मुंबई, दिल्लीसह विदेशाचा फेरफटका करतात. पुस्तकी ज्ञान नसले तरी जगभर फिरण्याचे व्यावहारिक ज्ञान व ‘शिक्षण’ आम्हाला लेणीने मिळवून दिले आहे. यावरच आमची आर्थिक प्रगती चांगली झाली; परंतु गेल्या ३ वर्षांपासून विविध कारणांनी आमच्या धंद्याला ‘नजर’ लागली. त्यामुळे आता पोट भरण्यासाठी काय करावे, याची चिंता सतावू लागली आहे, असे या व्यावसायिकांनी सांगितले.
हॉकर्समुळे व्यवसायाला फटकादसऱ्यापासून अजिंठा लेणीतील ‘सीझन’ सुरू होतो, तो जानेवारी अखेरपर्यंत चालतो. यंदा मात्र ‘सीझन’ जाणवलाच नाही. महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने पर्यटकांनी लेणीकडे पाठ फिरविली आहे. त्यात पर्यटक टी पॉइंटवरील व्यापारी संकुलात न येता सरळ लेणीत निघून जात आहे. आणि अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या हॉकर्समुळेही आमचा धंदा बसल्याचे या विक्रेत्यांचे म्हणणे आहे.