मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा म्हणणा-या अजित पवारांचा एकत्र विमान प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 12:48 PM2017-11-22T12:48:57+5:302017-11-22T12:54:34+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. एका लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार औरंगाबादला निघाले होते.
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. एका लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार औरंगाबादला निघाले होते. यावेळी दोघेही एकाच विमानात होते. लग्नसोहळ्याला पोहोचण्यासाठीही दोघांनी एकाच गाडीचा वापर केला. यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्र्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण २०१९च्या निवडणुकीपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचं सांगत, त्यांची संगत टाळणार असल्याचं अजित पवार काही दिवसांपुर्वी बोलले होते.
लग्नासोहळ्यासाठी रात्री मुख्यमंत्री मुंबईहून आपल्या खास विमानाने औरंगाबादकडे निघाले होते. त्यांनी आपल्या दौ-याची माहितीही उघड केली नव्हती. चिकलठाणा विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर अजित पवारही त्यांच्यासोबत होते याची माहिती मिळाली. दोन्ही नेते विमानातून उतरल्यानंतर एकाच गाडीनं लग्नकार्यात पोहोचले. आता या प्रवासात दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र कळू शकलेलं नाही.
मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा! यापुढे फडणवीसांना बोलावणार नाही - अजित पवार
२०१९च्या निवडणुकीपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर केले होते. आमचे मुख्यमंत्र्यांशी भांडण नाही, परंतु, यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व दिलीप वळसे यांच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यातील उपस्थितीवरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्या सोहळ्याकडे पाठ फिरवली. शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेतलेली असताना राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये जवळीक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या चिंतन बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे यापुढे कोणत्याही नेत्याच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री अथवा भाजपाच्या नेत्यांना न बोलविण्याचा निर्णय झाला होता.