'संविधानाला तिलांजली देण्याचे काम भाजपने केले'; अजित पवारांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:09 PM2023-04-02T20:09:19+5:302023-04-02T20:09:35+5:30
'राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले. असेच घडत राहिले, तर कोणत्याच राज्यात स्थिरता राहणार नाही.'
छत्रपती संभाजीनगर- आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातल्या सरकारवर सडकून टीका केली. तसेच, येणाऱ्या काळात अमरावती, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, पुण्यातही सभा होणार असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणतात, येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी सगळेजण जीवाचं रान करतील, सगळे कार्यकर्ते यासाठी लढतील, त्याबद्दल मनात शंका नाही. आज ही वेळ का आली? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेला नाव दिले आणि धनुष्यबाण सर्वदूर पसरवण्याचे काम केले. आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत, पण अशाप्रकारचा निर्णय कधीच ऐकला नाही. आम्ही संविधानासमोर नतमस्तक झालो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर केला पाहिजे. परंतू, याला तिलंजाली देण्याचे काम भाजपने केले आहे.
राज्यातील सरकार पाडण्याचे काम त्यांनी केले. हे असेच घडत राहिले, तर देशातल्या प्रत्येक राज्यात स्थिरता राहणार नाही. अशामुळे उद्योगधंडे येणार नाही. यातून लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार होणार नाही. प्रशासनालाही कोण कधी येईल, कोण कधी जाईल, याचा विश्वास नसेल तर प्रशासन चांगल्य पद्धतीने चालणार नाही. ज्याप्रकारचे एक गट बाजुला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. अशाप्रकारे निर्णय दिला तर पुढे काय होणार. सुप्रीम कोर्टात हा निर्णय बाकी आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.