छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातल्या सरकारवर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी सावरकर गौरव यात्रेवरुनही सरकारला थेट आव्हान दिले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. ते म्हणाले, मराठवाडा साधू-संतांची भूमी आहे. मराठवाड्याने राज्याला पुढे नेण्यासाठी कार्य केले आहे. देश स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा स्वातंत्र्य व्हायला 13 महिने लागले. याच मराठवाड्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 13 मिनिटे दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याबाबत अधिवेशनात वेळ द्यायला हवा, अशी आमची भूमिका होती. देशाच्या स्वातंत्र्याप्रमाणे या कार्यक्रमालाही वेळ दिला पाहिजे. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी वेळ दिला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही स्वतःला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि मराठवाड्यातील जनतेचा अपमान करता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाईं फुलेंचा अपमान केला. तुम्ही त्यांना काहीही म्हटले नाही. तुमच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, भाऊराव पाटलांचा अपमान केला. आम्हाला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे. त्यांनी काम केले म्हणून आपण आज हे दिवस पाहतोय. तुम्ही तुमच्या नेत्यांना काहीच बोलणार नाहीत.
मध्यंतरी काही घटना घडल्या, सावरकरांच्या बाबतीत बोललं गेलं. यानंतर वडिलकीच्या नात्याने मान्यवरांनी त्यांची समजूत घातली आणि प्रकरण शांत केले. त्यानंतरही तुमचे नेते गौरवर यात्रा काढत आहेत. यात्रा काढण्यासाठी विरोध नाही, पण त्यात राजकारण आहे. सावरकरांबद्दल आम्हालाही आदर. तुमच्या मनात खरचं आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.