४३ व्या मराठवाडा साहित्य संमलेनाचे उद्धाटन अजित पवारांच्या हस्ते होणार
By राम शिनगारे | Published: November 20, 2023 05:27 PM2023-11-20T17:27:28+5:302023-11-20T17:29:51+5:30
२ व ३ डिसेंबर रोजी गंगापूरच्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात आयोजन
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४३व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर समारोप कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आयोजक समितीचे मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम असणार आहेत.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेचे ४३वे मराठवाडा साहित्य संमेलन २ व ३ डिसेंबर रोजी आयोजित केले आहे. या संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण बोलत होते. यावेळी मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ, कार्यवाह त्रिंबकराव पाथ्रीकर, दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, प्राचार्य डॉ. सी. एस. पाटील आणि समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांची उपस्थिती होती. यावेळी आ. चव्हाण म्हणाले की, श्री मुक्तानंद महाविद्यालयात आयोजित साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागातही साहित्याची मेजवानी मिळावी हा आयोजनामागील हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संमेलनात म्हणून मी लिहितो/लिहिते, सत्यशोधक चळवळीची दीडशे वर्षे, परिघाबाहेरचे साहित्य हुंकार, या विषयांवर पाच परिसंवाद, दोन कविसंमेलने, कथाकथन, ‘आठवणींचे पक्षी’ या प्र. ई. सोनकांबळे यांच्या आत्मकथनावर परिचर्चा, मराठवाड्यातील नामांकित कवी-गीतकारांशी संवाद, प्रा. राजेश सरकटे निर्मित ‘चंदनाच्या विठोबाची माया गावा गेली’ हा मराठवाड्यातील कवितेचा ८०० वर्षांचा इतिहास मांडणारा काव्यगायनाचा कार्यक्रम तसेच बालकुमार मेळावा, असे कार्यक्रम होणार आहेत. त्याशिवाय ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनही आयोजित केल्याची माहिती प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
ना. धों. महानोर यांच्या नावे साहित्यनगरी
साहित्य संमेलन होणाऱ्या ठिकाणाला काही महिन्यांपूर्वी निधन झालेले कविवर्य ना. धों. महानोर साहित्यनगरी असे नाव दिले आहे. त्याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठ, संत बहिणाबाई व्यासपीठ अशी नावे व्यासपीठांना देण्यात आली आहेत.