"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:39 PM2024-09-27T13:39:20+5:302024-09-27T13:39:57+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतिश चव्हाण यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे...
राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून केव्हाही घोषणा होऊ शकते. सध्या राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांची युती आहे. मात्र, असे असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांनी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाम यांनी म्हटले आहे.
चव्हाण म्हणाले, "या मतदारसंघात मी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून काम करत आहे. मतदारसंघातही अस्वस्थता आहे. म्हणावा तसा विकास या मतदारसंघात झालेला नाही. यातच गेल्या 15 वर्षांपासून कार्यकर्त्यांचीही मोठी घुसमट होत आहे. त्यामुळे येथे काम करत असताना लोकांना बदल अपेक्षित असल्याचे माझ्या लक्षा आले. यामुळे मी येथून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे." ते एबीपी माझासोबत बोलत होते.
भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, "आता सर्व्हेचा जमाना आहे. थोडे कमी-अधिक होईल, पण जनता ज्याला पसंती देते, त्याचे सर्व्हेमध्ये नाव येते आणि सर्व्हेमध्ये जाचे नाव आले, त्याला पक्ष अथवा संबंधित आघाडी उमेदवारी देते, असे सुरू आहे. त्यामुळे लढावे तर लागेल. त्यामुळे सर्व्हेतही मी पुढे येईल असे वाटते."
सर्व्हे करून तिकीट ठरवावे अशी इच्छा आहे का? असे विचारले असता, "असे नाही मला लढायचेच आहे. कारण सर्व्हेचे अंदाजही चुकू शकतात. त्यांच्या अथवा आमच्या बाजूने. पण लढणे मला क्रमप्राप्त आहे, कारण कार्यकर्त्यांचा माझ्यामागे प्रचंड आग्रह आहे," असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. सध्या भाजपचे प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे आमदार आहेत.