औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेक संघ ही काही केवळ संस्था, संघटना नाही, तर आम्ही सर्वांनी शिस्तबद्धरीत्या राष्ट्र उभारणीसाठी स्वीकारलेली जीवनपद्धती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक कोण, त्याची व्याख्या करायची झाल्यास असं म्हणावं लागेल की, सर्व कार्य करूनही जो ‘अकर्ता’ राहतो, मी अद्याप काहीच केलेले नाही, अजून मला या देशासाठी, राष्ट्रासाठी खूप काही करायचे आहे, असे म्हणून जो एखादे काम केल्यावर त्याचे श्रेय स्वतःकडे न घेता बाजूला होतो आणि पुन्हा दुसरे मोठे कार्य करण्यासाठी पुढे निघतो, तो स्वयंसेवक. आपले सर्वस्व समाजासाठी देतो, तो स्वयंसेवक होय, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आ. हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.
ते ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ. के. ब. हेडगेवार’ या विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या दामूआण्णा दाते सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रा. स्व. संघाचे विभाग संघचालक अनिल भालेराव म्हणाले की, संघ आज सर्वव्यापी झाला आहे. जगात सर्वांत मोठी संघटना म्हणून संघ नावारूपाला आला आहे. श्रेय न घेता राष्ट्र उभारणीचे काम करीत राहिल्यानेच संघ इतका मोठा होऊ शकला, हेच संघमंत्राचं सूत्र आहे.
आ. अतुल सावे, देवगिरी बॅंकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांचीही भाषणे झाली. राजीव जहागीरदार यांनी प्रास्ताविक केले. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आश्विनकुमार तुपकरी यांनी आभार प्रदर्शन केले. वैभव पांडे यांनी वैयक्तिक गीत सादर केले. सुहास वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.