खुलताबाद (औरंगाबाद) : एमआयएमचे वरिष्ठ नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही, मात्र एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
एमआयएमचे वरिष्ठ नेते आ. अकबरुद्दीन औवेसी खुलताबाद येथे येणार असल्याने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आ. औवेसी यांना बघण्यासाठी व भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. खुलताबाद येथील बावीस खाजा दर्गा परिसरात दुपारी दीड वाजेच्या सुमारास आ. अकबरुद्दीन औवेसी यांचे आगमन झाले या ठिकाणी हजरत खाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गेत जावून दर्शन घेतले. त्यानंतर औरंगजेब याच्या कबरीवर जावून त्यांनी फुले वाहिली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दर्गा परिसरातील मशीदमध्ये जावून सर्वसामान्यपणे नमाज अदा केली. त्याचबरोबर बाबा बु-हानोद्दीन दर्गेत तसेच उरूस मैदान परिसरातील जर जरी जर बक्ष दर्गेत दर्शन घेतले. आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी कुठलाही चर्चा केली नाही. तसेच त्यांनी यावेळी कोणाशी काही न बोलता केवळ मनोभावे दर्शन घेत औरंगाबादला रवाना झाले. यावेळी खा.इम्तीयाज जलील, वारीस पठाण, गफ्फार कादरी, दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, मुब्बशीरोद्दीन, माजी नगराध्यक्ष अँड कैसरोद्दीन, महंमद नईम बक्ष, एमआयएमचे तालुकाध्यक्ष अब्दुल मजिद मणियार आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
शिवसेनेची टीका मात्र, त्यांच्या औरंगजेब याच्या कबरीचे दर्शनाने नवा वाद पेटला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे. खैरे म्हणाले, आजवर या कबरीचे कोणीच दर्शन घेतले नाही. एमआयएम नेत्यांनी आज दर्शन घेऊन नव्या पद्धतीचे राजकारण सुरु करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खैरे यांनी केला.
एमआयएमचे विकासाचे राजकारणतर या प्रकरणी बोलताना एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी सर्व जन येथील दर्गांचे दर्शन घेतात, यात काहीच गैर नसल्याचे म्हटले आहे. तर खा. इम्तियाज जलील यांनी खुलताबाद येथे अनेक दर्गे आहेत. सर्वांचे दर्शन घेत आम्ही तिथे गेलो. यावेळी आम्ही कोणा एकाच्या कबरीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत असे म्हटले आहे. तसेच औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे राजकारण करत आहेत असा दावा केला.