औरंगाबाद : वर्धा येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनापाठोपाठ सतत दुसऱ्यांदा म्हणजेच ९६ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाड्याला मिळाला आहे. अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाला मराठवाड्याने आतापर्यंत सहा अध्यक्ष दिले असून न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर हे सातवे अध्यक्ष ठरले आहेत.
कोरोना महामारीनंतर दोन वर्षांच्या खंडानंतर ९४ वे साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडले होते. त्यानंतर केवळ चार महिन्यांनंतर ९५ वे साहित्य संमेलन उदगीर येथील उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ ते २४ एप्रिलदरम्यान पार पडले. जालन्याचे भूमिपुत्र भारत सासणे अध्यक्षपदी होते, तर आता ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान औरंगाबादचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मिळाला आहे.
यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले मराठवाड्यातील सारस्वत- डॉ. यु.म. पठाण (औरंगाबाद) हे पुण्यात १९९० मध्ये झालेल्या ६३ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (नांदेड) हे चिपळूणला २०१३ मध्ये झालेल्या ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- प्रा. फ.मुं. शिंदे (औरंगाबाद) यांनी २०१४ मध्ये सासवडे येथे झालेल्या ८७ व्या संमेलनाचे अध्यक्ष भूषविले आहे.- डॉ. श्रीपाल सबनीस (लातूर) यांनी पिंपरीत २०१६ मध्ये झालेल्या ८९ व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख (उस्मानाबाद) हे २०१८ मध्ये बडोद्याला झालेल्या ९१ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
मराठवाड्यात झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व अध्यक्षमराठवाड्यात आतापर्यंत सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. ३९ वे साहित्य संमेलन १९५७ मध्ये औरंगाबादेत झाले होते व अध्यक्षपदी अनंत कानेकर होते. त्यानंतर मराठवाड्याच्या वाट्याला थेट १९८३ मध्ये ५७ वे साहित्य संमेलन आले. अंबाजोगाईत झालेल्या त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी व्यंकटेश मांडगूळकर हे होते. १९९५ मध्ये परभणीत ६८ वे साहित्य संमेलन कवी नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षपदी पार पडले. १९९५ नंतर लगेच तीन वर्षांनी १९९८ ला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान परळी वैजनाथला मिळाला. या ७१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी द.मा. मिरासदार होते. त्यानंतर २००४ मध्ये औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयास ७७ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा सन्मान मिळाला. रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. २०२०मध्ये ९३ वे साहित्य संमेलन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबादेत संपन्न झाले.