मानाच्या समजल्या जाणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या ‘स्थलपुराण’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या महोत्सवामध्ये ‘स्थलपुराण’ चित्रपटाला अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे दोन पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट’ आणि ‘भारतातील सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक’ या दोन पुरस्कारांचा समावेश आहे. अक्षय इंडीकरच्या या कामगिरीमुळे मराठी सिनेमा हा जागतिक सिनेमा म्हणून नावारूपाला येत असल्याने सर्वच स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलाकार उपस्थित होते.
प्रिया बापट पुन्हा साकारणार हटके भूमिका
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सिरीजमध्ये लेस्बियन महिलेची भूमिका साकारली होती. या वेब सिरीजमध्ये तिने किसिंग सिनदेखील दिले होते. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती. आता पुन्हा एकदा प्रिया अशाचप्रकारची भूमिका साकारणार आहे. ‘फादर लाईक’ या तिच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सिनेमात प्रिया एका लेस्बियन तरुणीची भूमिका साकारणार आहे. यात ती ‘साराह’ची भूमिका साकारणार असून, तिच्या लेस्बियन गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री गीतिका विद्या ओहलान साकारणार आहे. गीतिकाच्या भूमिकेचे नाव सेरेना असून, ती लॉकडाऊनमध्ये सिंगापूरला अडकते. लॉकडाऊनमधील त्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशीपबाबत या चित्रपटात दाखवले आहे.
तमिळ चित्रपटाला जान्हवीचा नकार
जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पहिल्याच चित्रपटातून जान्हवी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. परंतु, ‘धडक’ पूर्वी तिला महेश बाबूसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु, तिनं त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. जान्हवी आणि महेश बाबूच्या वयामध्ये बरंच अंतर आहे. अन् त्यामुळं रुपेरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री उत्तम दिसेल का? याबाबत तिच्या मनात शंका होती. त्यामुळं तिनं वयाचं कारण सांगून नकार दिला. दरम्यान, तिला ‘धडक’मध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. शिवाय तिच्या वयाच्या अनुरुप असलेल्या अभिनेत्यासोबतच तिला काम करायचं होतं. त्यामुळं तिनं ‘धडक’मध्ये काम करण्यास होकार दिला.