जालना: साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया आहे. या दिवशी सराफासह सर्वच बाजारपेठेत चांगली उलाढाल होण्याचा अंदाज असतो. यंदा सर्वच बाजारपेठेत उलाढाल मंदावली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अक्षय तृतीयेला अनेकजण सोने तसेच नवीन वस्तू अथवा नवीन घर घेण्यासाठी इच्छुक असतात. काही मोठी दालने तसेच बिल्डर्स यानिमित्त सुटही देतात. असे असले तरी यंदा म्हणावी तशी उलाढाल बाजारपेठेत झाली नसल्याचे चित्र होते. सराफा बाजारातही शांतता दिसून आली किरकोळ ग्राहकी वगळता मोठी खरेदी झाली नसल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत मणी, मंगळसूत्र, कर्णफुल आदी छोट्या दागिण्यांची खरेदी झाली. एकूणच अक्षय तृतीया मोठा सण असला तरी उलाढाल साधारणच होती. दरम्यान, काही सराफा दलानात बऱ्यापैैकी उलाढाल झाल्याचे गर्दीवरून दिसून येते. वाहन बाजारातही विशेष उलाढाल झाली नसल्याचे वाहन दालनाच्या व्यवस्थापकांनी सांगितले. आमच्या दालनातून सुमारे तीस ते चाळीस दुचाकींची विक्री झाली. बीएस तीन वाहन जेंव्हा बंद झाले तेव्हा मोठ्या प्रमाणात दुचाकींची विक्री झाली. त्यामुळे अक्षय तृतीयेला कमी उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला. दरम्यान, दुचाकीसोबतच अनेकांनी चारचाकी वाहनांचीही खरेदी केली. अक्षय तृतीयेनिमित्त बाजारपेठांमध्ये किरकोळ खरेदीसाठी मोठा उत्साह दिसून आला. विशेषत: मातीचे घडे तसचे आंबे खरेदीसाठी सिंधीबाजार, गांधीचमन, शिवाजी पुतळा भागात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र दुपारी उशिरापर्यंत होते. (प्रतिनिधी)
अक्षय तृतीयेला उलाढाल मंदावली
By admin | Published: April 29, 2017 12:52 AM