कन्नड : तालुक्यातील काही जणांनी खोटी माहिती देऊन पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा अपात्र लाभार्थींसाठी धोक्याची घंटा वाजत असून, संबंधितांना तलाठ्यांमार्फत तोंडी नुकत्याच सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काही दिवसांत त्यांना नोटीस देण्यात येणार असून, घेतलेला लाभ परत जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे अशा लाभार्थींचे धाबे दणाणले आहे. शेतकऱ्यांना काही प्रमाणात का हाेईना दिलासा मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना आखली होती. यासाठी पात्र शेतकऱ्यांकडून ऑनलाईल अर्ज मागविण्यात आले होते. मात्र कन्नड तालुक्यातील काही जणांनी खोटी माहिती भरून लाभ घेण्याचा पुढे येत आहे. त्याअनुषंगाने आयकर विभागाने तालुक्यातील अशा एक हजार ६ लाभार्थींची माहिती संबंधित यंत्रणेला दिली आहे. या लाभार्थींचे आधार कार्ड लिंकिंग असल्याने त्यांची संपूर्ण माहिती शासनाकडे आहे. तसेच २५३ अपात्र लाभार्थींनीही लाभ मिळवला असल्याचे यातून उघड झाले. त्यात पती-पत्नीने एकत्रित लाभ घेणे यासह शासकीय नोकरदारांचा सुद्धा यात समावेश आहे. त्यामुळे अशा एक हजार २५९ लाभार्थींनी एकूण एक कोटी २१ लाख ७० हजार रुपयांचा लाभ पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून मिळवलेला आहे. या लाभार्थींना संबंधित तलाठ्यांमार्फत तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. लाभापोटी मिळालेली रक्कम तात्काळ शासनाकडे जमा करावी अन्यथा त्यांच्या जमिनीवर बोजा टाकण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. यासह खोटी माहिती दिल्याबद्दल संबंधिताविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.त्या लाभार्थींना बजावणार नोटीसपंतप्रधान सन्मान योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन भरताना अनेकांनी खोटी माहिती भरल्याचे उघड होत आहे. याेजनेला आधारशी जोडण्यात आल्याने लाभार्थींची सर्व माहिती शासनाकडे जमा झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना अनेकांनी शासनाची दिशाभूल करून अनुदान घेण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. कन्नडसह औरंगाबाद जिल्ह्यात असे प्रकार झाले असून, महसूल विभागातर्फे अपात्र लाभार्थींकडून घेतलेला लाभ परत घेण्यात येत आहे. यासाठी संबंधितांना नोटीस बजाविण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थींसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 1:43 PM
कन्नडमधील किसान सन्मान योजनेत १२५९ लाभार्थी
ठळक मुद्देबोगस लाभार्थ्यांनी सव्वा कोटीचा घेतला लाभ