बीड : हर-हर महादेव, जय भोलेनाथ अशा जयघोषामध्ये शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरात विविध शिवमंदिरे दुमदुमली. परळीमध्ये पाच लाखांवर भाविकांनी दाटीवाटीने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या चरणी भक्तिभावाने माथा टेकला. चाकरवाडी, कनकालेश्वर, उत्रेश्वर पिंप्री आदी प्रमुख मंदिरामध्येही लाखो भाविकांची रीघ लागली होती.बीडमधील मंदिरांना यात्रेचे स्वरूपबीड शहरातील ऐतिहासिक कनकालेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप होते. शहरातीलच सोमेश्वर, पापनेश्वर, जटाशंकर, बोबडेश्वर, उत्रेश्वर इ. मंदिरांमध्येही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तालुक्यातील चाकरवाडी, उत्रेश्वरपिंप्री येथेही लाखो भाविकांनी हजेरी लावली. दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. दूरदूरहून भाविक दर्शनासाठी आले होते. फराळ, खेळणीची दुकाने लागली होती. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बीड शहराजवळील शिवदराही गजबजले होते.सिद्धेश्वरच्या दर्शनाला पाऊण लाख भाविकांची उपस्थितीशिरूर तालुक्यातील धाकट्या अलंकापुरीत महाशिवरात्रीच्या महापर्वणीत पहाटेपासूनच दर्शनाच्या रांगा होत्या. पाऊण लाख भाविकांची उपस्थिती होती. संस्थान परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सिंदफणेच्या काठावर सिद्धेश्वराचे हेमाडपंथी मंदिर असून, वै. अंबादेव महाराज यांनी हा महाशिवरात्र उत्सव सुरू केला आहे. त्याचे हे ३९ वे वर्ष आहे. ७ दिवसांपासून भव्यदिव्य नामसप्ताह सुरू असून, कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रम सुरू आहेत. शिवरात्रीच्या पूर्वरात्री प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन झाले. शिवरात्रीच्या दिवसभर फराळाची सोय अमरशेठ डुंगरवाल यांनी केली होती. आ. भीमराव धोंडे यांनी दुपारी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. संकलेश्वर मंदिरात प्रथमच यात्राअंबाजोगाई शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या ११ व्या शतकातील पुरातन यादवकालीन संकलेश्वर मंदिर (बाराखांबी) येथे या वर्षी प्रथमच मोठी यात्रा भरवण्यात आली. शिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उत्खननामुळे चर्चेत आलेल्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील अमृतेश्वर मंदिर, नागनाथ मंदिर, बुट्टेनाथ मंदिर, खोलेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, पुत्रेश्वर मंदिर या सर्व शिवालयांमध्ये महिला व भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष हनुमंत पोखरकर, सचिव विजयकुमार चलवदे, अॅड. किशोर गिरवलकर, सुनील व्यवहारे, गणेस रुद्राक्ष, राजू रेवडकर, शेख युनूस यांनी परिश्रम घेतले.आष्टी तालुक्यातही दर्शनासाठी रांगाआष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिर तसेच तालुक्यातील वटणवाडी, कडा, नागतळा सह विविध भागातील शिवालये भाविकांनी गजबजून गेली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पंचायत समिती समोर भाऊसाहेब बन या हॉटेलचालकाने शिवमूर्ती तयार केली होती. सर्व भाविकांना चहाचे मोफत वाटप केले. उत्रेश्वर पिंप्रीतही गर्दीवडवणी तालुक्यामधील राजा हरिश्चंद्राचे मंदिर असलेल्या उत्रेश्वर पिंप्री येथेही हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तालुक्यातील चिंचवण व इतर ठिकाणच्या शिवमंदिरामध्येही धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.भाविकांनी गजबजले परळी शहर४देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी (ता. बीड) येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. आठवडाभर चालणाऱ्या या महाशिवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे शुक्रवारी दर्शन घेतले.४महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, गुजराथ येथील भाविक परळी येथे दाखल होत आहेत. पुढील आठवडाभर परळी येथे यात्रौत्सव चालतो. शुक्रवारी पहिल्याच दिवशी पाच लाखांवर भाविकांनी रांगेत उभे राहून प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले.४सकाळपासूनच शहरासह परिसरात आनंदी वातावरण पाहावयास मिळाले. ‘हर हर महादेव’च्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेटस् उभारण्यात आले होते. उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मोठा मंडपदेखील मंदिर परिसरात उभारण्यात आला आहे.४शुक्रवारी सकाळी मंदिराचा गाभारा ते न.प. कार्यालयापर्यंत भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर, सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.४ यावेळी विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, बापूसाहेब देशमुख, सूर्यकांत मोहरीर, नंदकिशोर जाजू, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नीळकंठ पुजारी यांची उपस्थिती होती. भाविकांच्या गर्दीमुळे रेल्वे स्थानक, बसस्थानक गजबजले होते.
शिवमंदिरांमध्ये ‘हर-हर महादेव’चा गजर
By admin | Published: February 25, 2017 12:27 AM