छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी जिल्ह्यात १२४ टक्के मोसमी पाऊस पडला. या पावसानंतरही चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असतानाही मार्च महिन्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील भूजल पातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली आहे. वैजापूर तालुक्यातील भूजलस्तर सर्वाधिक ३.५ मीटरने घटल्याचा धक्कादायक अहवाल आहे.
कडक उन्हामुळे जिल्ह्यातील लहान-मोठी आणि मध्यम धरणे तळ गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाकडून दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यानंतर मे महिन्यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये भूजल सर्वेक्षण करण्यात आले. गतवर्षी जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. यंदा उन्हाळ्यात भूजल पातळी घटणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनाला मिळाला. या अहवालानुसार मार्च महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यातील ९ तालुक्यांची भूजलपातळी सरासरी ०.९१ मीटरने घटली. मार्च महिन्यात छत्रपती संभाजीनगरची भूजल पातळी ९.६५ मीटरवर होती. ही भूजल पातळी मे महिन्यात १०.१८ मी. खोलपर्यंत गेली. गंगापूर तालुक्यातील भूजल पातळी मार्च महिन्यात ११.८७ मीटरवर होती. ही मे महिन्यात १२.४७ मीटरपर्यंत खोल गेली. कन्नड तालुक्यात मार्च महिन्यात १२.५७ मीटर भूजलपातळी होती. ती मेमध्ये १३.१७ मीटरपर्यंत वाढली. खुलताबादचा १३ वरून भूजलस्तर १३.४३ मीटरवर गेला. पैठणची भूजलपातळी मार्च महिन्यात १२.६३ मीटर वर होती. ती १३.१२ मीटरपर्यंत घसरली आहे. मार्च महिन्यात फुलंब्री तालुक्याचा भूजलस्तर १०.३५ मीटर होता. तो ११.०४ मीटरपर्यंत खोल गेला आहे. सिल्लोड तालुक्याची भूजलपातळी १०.१५वरून १०.९८ मीटर झाली.
सर्वात चांगली भूजलपातळी सोयगावचीमार्च महिन्यात सोयगाव तालुक्यातील भूजलपातळी जिल्ह्यात सर्वात कमी ६.६७ मीटरवर होती. मे महिन्याच्या सर्वेक्षणानुसार ही पातळी ७.२५मीटर खोलपर्यंत गेली आहे.
सर्वात वाईट अवस्था वैजापूरचीकमी पर्जन्यमानाचा तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या वैजापूर तालुक्याची मार्च महिन्यात भूजलपातळी १०.४४ होती. दोन महिन्यात साडेतीन मीटर घट होऊन १३.९४ मीटर झाली.
जिल्ह्यातील ११० गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईजिल्ह्यातील ११० गावांत पाणीटंचाई आहे. ३० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित गावांची तहान भागविण्यासाठी १११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मृग नक्षत्र कोरडे गेले. २२ जूनपासून आर्द्राला प्रारंभ झाला तरी अद्याप मुसळधार पावसाला सुरुवात न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.