तुळजापूर : राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावाची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी शासनाच्या वतीने पुरस्कार व प्रमाणपत्र देवून या ग्रामपंचायतीचा सन्मान केला जाणार आहे. गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून व संपन्न गावची निर्मिती करण्याचा दृष्टीने राज्यात सन २०१०-२०११ पासून पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सुरु करण्यात आली. या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये तालुक्यतील १०८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. यातून स्वमुल्यांकनात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या २५ टक्के म्हणजेच २७ ग्रामपंचायतीची स्पर्धेसाठी निवड झाली. यातून अलियाबाद ही ग्रामपंचायत प्रथम आली आहे. अलियाबाद गावाची लोकसंख्या ११२० असून, गावातील ९० टक्के कुटुंबांनी स्वच्छतागृह उभारले आहे. तसेच गावात लोकसंख्येचा तीनपट विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीने पर्यावरण विकास तसेच निर्मल ग्राम पुरस्कारही मिळविला आहे. संत गाडगेबाबा अभियानातही ही ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम आली आहे. २६ जानेवारी रोजी १० लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
आलियाबाद झाले ‘स्मार्ट ग्राम’
By admin | Published: January 02, 2017 11:51 PM