सिल्लोड : सोयगाव व सिल्लोड तालुक्यांमध्ये प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी या अर्थसंकल्पात दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी १० कोटी प्रमाणे २० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये आता एका छताखाली येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
ग्रामीण भागातून प्रशासकीय कामासाठी आलेल्या सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या कार्यालयात फिरावे लागते. यातील काही कार्यालये एकमेकांपासून लांब असल्याने सर्वसामान्यांची फरफट होते. जनतेची ही फरफट थांबविण्यासाठी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय वगळता इतर सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच आवारात येणार आहेत. त्यामुळे जनतेची फरफट आता थांबणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी निधी मंजूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.