औरंगाबाद:जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंनी नागरिकांना कोरोना संसर्ग परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगत नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने विविध धर्मांच्या धर्मगुरूंसोबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सहायक पोलीस आयुक्त ए.डी.बनकर, उपायुक्त जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर उपस्थित होते.
धर्मगुरूंमध्ये जमाते-ए-इस्लामी हिंदचे वाजेद कादरी, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे हाफीज अजीम साबर, मुजीबउल्ला कासमी, सुन्नी जमातचे हाजी युनूस आदम अली, जागरण समितीचे मोहसीन अहेमद, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे नायब अन्सारी, खादीमीन मासुमीन शिया पंथचे एजाज झैदी, आलम बरदार कमिटीचे माजी महापौर रशीद मामू मोहसीन अहेमद, एकबाल अन्सारी, खलील खान, हाफिज आजीम शाह, समर जैदी यांच्यासह धम्मदीप बुद्ध विहाराचे भदंत सुदत्त बोधी, पार्श्वनाथ जैन मंदिरचे महावीर ठोळे, महानुभाव आश्रमाचे धर्मराज महानुभाव, संस्थान गणपती मंदिराचे प्रफुल मालाणी, एकनाथ मंदिराचे एस. के. शेलार, धावणी मोहल्ला गुरूव्दाराचे खडकसिंगजी, उस्मानपुरा येथील गुरूव्दाराचे मनिंदरसिंगजी, रेणुका मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत धर्मगुरूंनी केलेल्या सूचना अशाअफझल शहा यांनी समाज माध्यमांवर कोरोना नसल्याबाबतचे अनेक चुकीचे व्हिडिओ प्रसारित होत असतात. त्यावर प्रशासनाने प्रतिबंध आणण्याची सूचना केली. माजी महापौर रशीद मामू म्हणाले, विनाकारण गर्दी करणाऱ्या ठिकाणात पानटपरी, हॉटेल, गल्ली, मोहल्ल्यांमध्ये, ज्या घरांसमोर, चौकांचा समावेश आहे. तेथील लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तर भदंत सुदत्त बोधी यांनी मोकळ्या मैदानांमध्ये रात्रीच्या वेळी क्रिकेट वा तत्सम खेळ खेळण्यास प्रतिबंध आणावा, अशी सूचना केली. पार्श्वनाथ जैन मंदिराचे महावीर ठोळे, संत एकनाथ मंदिराचे एस.के.शेलार व इतरांनी मंदिरांमधून कोविड नियमावलीचे पालन करण्यात येत आहे. विविध धार्मिक उत्सव, पूजा विधीचे कार्यक्रम स्थगित केल्याचे नमूद केले.