- सुनील गिऱ्हे
औरंगाबाद : आजच्या धकाधकीच्या युगात ‘जीवन महाग अन् मरण स्वस्त झाले.’ क्षणभराच्या रागाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली,’ अशी काही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यात झाली असून, ११ महिन्यांत जवळपास साडेतीनशे जणांनी अत्यंत किरकोळ कारणांवरून या जगाचा निरोप घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बहुतांश कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. कौटुंंबिक कारणांमुळे, तसेच आर्थिक अडचणीमुळेही आत्महत्येचे प्रमाण अधिक असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यासुद्धा गंभीर बाब असून, पालकांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ९४ महिलांनी विविध कारणांची जीवनयात्रा संपविली, तर २५९ पुरुषांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अशा प्रकारे एकूण ३५३ जणांनी आपल्या मागे असलेल्या कुटुंबाचा कोणताही विचार न करता थेट मरणाला कवटाळले असून, ३५३ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ३० ते ६० वर्षे वयोगटातील महिला व पुरुषांचा समावेश असला तरी जवळपास १५ विद्यार्थ्यांनीही मरण जवळ केले, ही गंभीर बाब असून, पालकांनी पाल्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानेही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत किरकोळ कारणांमुळे काहींनी गळफास घेतला, काहींनी स्वत:ला जाळून घेत रोजच्या कटकटीतून मुक्तता मिळविली, तर काहींनी विष प्राशन करून घरसंसारातून कायमची एक्झिट घेतली. बहुतांश ३० ते ६० वर्षे वयोगटातील महिला, पुरुषांनी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी रेल्वेखाली उडी घेत मरणाला कवटाळले असून, काही महिला, पुरुषांनी मोठमोठ्या प्रकल्पात स्वत:ला झोकून दिले आहे.
पैठण एमआयडीसी ठाणे हद्दीत वर्षभरात ३३ जणांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात महिला, पुरुषांसह युवकांचाही समावेश आहे. चिकलठाणा ठाणे हद्दीत १५ जणांनी आत्महत्या केली. त्यात १३ पुरुष, तर २ महिलांचा समावेश आहे. फर्दापूर ठाणे हद्दीत वर्षभरात १९, वाळूज ठाण्यांतर्गत गावांमध्ये १७, दौलताबाद पोलीस ठाणे २८, देवगाव रंगारी २६, वैजापूर १७ पुरुष आणि १५ महिला, अशा एकूण ३२, पाचोड पोलीस ठाणे ४०, फुलंब्री ठाणे १६ महिला, तर १४ पुरुष, अशा एकूण ३०, वीरगाव ठाणे ६ महिला आणि ७ पुरुष, तसेच कन्नड शहर व ग्रामीण ठाणे हद्दीत २४ जण किरकोळ कारणावरून कायमचे या जगातून निघून गेले. जिल्ह्यात इतर २१ पोलीस ठाण्यांतर्गत ९४ महिला व तब्बल २५९ पुरुषांनी जीवनयात्रा संपविली.
सोशल मीडियाचा अतिवापर सध्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मैदानी खेळाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. या कारणाने बौद्धिक क्षमता कमी होत असून, यामुळे माणसांमध्ये प्रेम, भावनांचा ओलावा कमी होत असून, याच कारणामुळे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. वेळीच याच्यावर ताबा न मिळविल्याने त्याचा मनावर अधिक वाईट परिणाम होतो. याच कारणातून आत्महत्या करणे, व्यसनाच्या आहारी जाणे, एकलकोंडे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कौटुंबिक वाद, आर्थिक अडचण, व्यसनही प्रमुख कारणआर्थिक अडचण आणि व्यसनामुळे पती, सासरच्यांकडून होणार छळ सहन न झाल्याने महिलांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे याबाबत सासर आणि माहेरच्या लोकांनी एकत्र संवाद साधून यावर तोडगा काढता येणे शक्य होते. मात्र, तसे न झाल्याने टोकाचे पाऊल उचलले जात आहे, तर दुसरीकडे बहुतांश पुरुष आर्थिक अडचणीत सापडल्याने व्यसनाधीन होतात आणि याच कारणातून ते आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे दिसून आले आहे.
पालकांनो, वेळीच सावध व्हा जिल्ह्यात वर्षभरात जवळपास १५ विद्यार्थ्यांनी गळफास घेतला असून, पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. आजकालच्या विद्यार्थ्यांची विचाराची क्षमता कमी झाली असून, आपल्यानंतर या कुटुंबियांचे काय होईल, त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, याचा कदापीही विचार न करता टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे पालकांनी पाल्यांशी संवाद साधण्याची गरज आहे. त्यांच्यावर दबाव न टाकता संवादातून अनेक सकारात्मक गोष्टी घडून येतात. त्यामुळे नकारात्मक विचार बाजूला सारण्यास मदत होईल. - प्रदीप देशमुख, मनोविकारतज्ज्ञ, घाटी रुग्णालय