औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंच पुतळा असून चौथऱ्यासह पुतळ्याची उंची ५२ फूट एवढी आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवड्यापासून राजकीय वादंग उभे राहिले असले तरी रात्री १२ वाजेपर्यंत अनावरणाचा सोहळा चालणार आहे.
विद्युत रोषणाईने क्रांती चौकाचे सुशोभीकरण केले आहे. चौकात उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींनी अनेक वर्षांपासून केली होती. त्यानुसार क्रांती चौकात ५२ फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयाे मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहील. आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील कार्यक्रमाला येतील, असे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
अनावरणाची वेळ बदलण्याची मागणीअनावरण रात्री १० वा. करण्यात यावे, अशी मागणी शिवजयंती उत्सव समितीने, मनसेने केली. तर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सायंकाळी ५ वा. अनावरण कार्यक्रम घेण्यासाठी गुरुवारी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. तसेच गुरुवारी समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आदींनी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेत अनावरणाची वेळ बदलण्याची मागणी केली. त्यानंतर कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रशासक पांडेय यांनी सांगितले, नियोजित वेळेतच रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान अनावरण सोहळा पार पडेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली १२ वाजेपर्यंत परवानगीक्रांती चौकातील पुतळ्याचा अनावरण सोहळा रात्री १०.०० ते १२.०० वाजेदरम्यान चालणार आहे. या सोहळ्यासाठी वाद्य आणि साउंडला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. मनपा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकारातील तीन दिवसांपैकी १८ फेब्रुवारीला पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या आदेशानुसार रात्री १२ नंतर मात्र कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे आदेश प्रशासक पांडेय यांनी काढले आहेत.