शहराला जायकवाडीहून ७०० आणि १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. ३ जून रोजी जायकवाडी जवळील पिंपळवाडी येथे ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाला एक दिवसाने वेळापत्रक पुढे ढकलावे लागले. त्यानंतर ९ जून रोजी चितेगाव टोलनाक्याच्या जवळ १४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. दुरुस्तीसाठी २२ तास लागले. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा एक दिवस पुढे ढकलावे लागले. शहरातील अनेक वसाहतींमध्ये आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा झाला.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जायकवाडी येथील पंपहाऊसमध्ये अचानक ट्रिपींग झाले. सर्वच्या सर्व पाच पंप बंद पडले. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठादेखील बंद झाला. सायंकाळी ज्या वसाहतींमध्ये पाणी पुरवठा होणार होता, त्या भागात पाणी पुरवठा झाला नाही. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरु होते. लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.