नांदेड :बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य घेवून माहिती, मनोरंजन आणि शिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे नांदेड आकाशवाणी २३ वर्ष पूर्ण करीत आहे़ मात्र आकाशवाणीची ही वाटचाल अपुर्या कर्मचार्यांवरच सुरू असल्याची माहिती आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी भीमराव शेळके यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़ नांदेड आकाशवाणीची सुरूवात ही २९ मे १९९१ रोजी करण्यात आली़ त्यावेळी करण्यात आलेल्या एका पाहणीत आकाशवाणीच्या कार्यकक्षेत केवळ २५० रेडिओ सेट असे होते की ज्यावर एफ एम अर्थात नांदेड केंद्र ऐकण्याची सुविधा होती़ मात्र पुढे तंत्रज्ञानाच्या वाटचालीत श्रोत्यांना ही सुविधा सहजपणे होत गेली़ नांदेड आकाशवाणीने तीन प्रसारण सभांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांना खिळवून ठेवले़ भक्तीसंगीत, लोकसंगीत, चित्रपट संगीत, नांदेड दर्पण, घरसंसार, गंमतजंमत, युवावाणी, फोनफर्माईश, थेट बांधावरून, किसानवाणी यासह जयंती, पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम प्रसारित होतात़ जि़ प़, मनपा़, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे निकालही जनतेला थेटपणे ऐकता आले आहेत़ नांदेड आकाशवाणी केंद्रासाठी एकूण ३४ कर्मचार्यांच्या पदांना मान्यता आहे़ मात्र प्रारंभापासूनही निम्म्याहून अधिक पदे येथे रिक्त आहेत़ आजघडीला केवळ १६ कर्मचार्यांवर आकाशवाणीचे प्रसारण चालविले जात आहे़ त्यात ४० नैमत्तिक उद्घोषकही आकाशवाणीत असल्याचे कार्यक्रमाधिकारी शेळके यांनी सांगितले़ यावेळी नांदेड आकाशवाणीचे वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक बळीराम वाकळे, सहायक भीमाशंकर गोरे यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी़़़ नांदेड आकाशवाणी केंद्राला २९ मे रोजी २३ वर्ष पूर्ण होत आहेत़ शासकीय कार्यालयाचा वर्धापन दिन हा रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे काम नांदेड आकाशवाणी गेल्या १० वर्षांपासून करते़ या शिबीरात आकाशवाणीच्या कर्मचार्यांसह श्रोतेही रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपतात़ लातूर, परभणी, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यातूनही रक्तदाते येत असतात़ नांदेड आकाशवाणीच्या प्रांगणात २९ मे रोजी सकाळी ८़३० वा़ होणार्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या हस्ते होणार आहे़ यावेळी श्रोता मेळावाही घेण्यात येणार आहे़
अपुर्या कर्मचार्यांवर आकाशवाणीची वाटचाल
By admin | Published: May 28, 2014 12:32 AM