औरंगाबाद : महापालिकेने घोषित केलेली वॉर्ड रचना वादात अडकलेली असताना आज राज्य निवडणूक आयोगाने त्यात किंचित बदल केला. २८ वॉर्डांच्या हद्दीत किरकोळ बदल करण्यात आले. अत्यंत छोटे-छोटे प्रगणक गट उचलून दुसऱ्या वॉर्डांमध्ये टाकण्यात आले. काही वॉर्डांच्या नावात अंशत: बदल केला आहे. महापालिकेने वॉर्ड रचनेचा अंतिम आराखडा राजपत्रात प्रसिद्ध केला. वादग्रस्त वॉर्ड रचनेला खंडपीठात आव्हान देण्याची तयारीही काहींनी सुरू केली आहे.
शहरातील ११५ वॉर्डांमध्ये सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात घेण्यासाठी महापालिका, राज्य निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेने ३ फेब्रुवारी रोजी वॉर्डांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला. याच वेळी महापालिकेने आरक्षणही रोटेशन पद्धतीने लागु केले. ही सर्व प्रक्रिया मॅनेज असल्याचा आरोप सुरू झाला. त्यात अनेक पुरावेही समोर आले. वॉर्ड आरक्षण करण्यासाठी, खुला करण्यासाठी प्रगणक गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी केल्याचे उघड झाले. महापालिकेतील काही मोजक्याच नगरसेवकांची सोय कशी होईल, यादृष्टीने सर्व रचना करण्यात आल्याचे उघड झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वॉर्ड रचनेत केलेली हेराफेरी उघड होताच शहरातील तब्बल ३७० नागरिकांनी यावर आक्षेप नोंदविले. या आक्षेपांची सुनावणी पुणे येथील साखर आयुक्त सौरभ राव यांनी १५ फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत घेतली. त्यात आक्षेपकर्त्यांनी वॉर्ड रचनेत कसे घोळ झाले याचे पुरावेच सादर केले. यानंतरही राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी वॉर्ड रचनेचा अंतिम आराखडा राजपत्रात प्रसिद्ध केला. यात अत्यंत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. २८ वॉर्डांच्या हद्दीत बदल करण्यात आले आहेत. एका वॉर्डातील प्रगणक गट उचलून तो दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आला आहे. मात्र, त्या वॉर्डातील नियोजित आरक्षणात कोणताही बदल होणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली आहे.
या वॉर्डाच्या हद्दीत बदल४भावसिंगपुरा-भीमनगर दक्षिण, नंदनवन कॉलनी-शांतीपुरा, सुरेवाडी, मिसारवाडी, विश्वासनगर, चेलीपुरा, लोटाकारंजा, भडकलगेट-बुढीलेन, कोतवालपुरा- गरमपाणी, खडकेश्वर, कैसर कॉलनी, मोतीकारंजा, भवानीनगर, समर्थनगर, सिल्लेखाना, संजयनगर, इंदिरानगर, बायजीपुरा, अल्तमश कॉलनी, कोटला कॉलनी, क्रांतीनगर, उस्मानपुरा, ठाकरेनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, मुकुंदवाडी, अंबिकानगर, मुकुंदवाडी, वेदांतनगर, कासलीवाल, भाग्योदय, वसंत विहार, देवळाई, गोपीनाथपुरम, हरिओमनगर आणि देवळाई गाव, सातारा तांडा या वॉर्डांमधील काही प्रगणक गट इकडून तिकडे टाकण्यात आले आहेत.
वॉर्डांच्या नावातही बदलवॉर्ड क्रमांक ७२ चे नाव विष्णूनगर होते. या वॉर्डात विष्णूनगरचा एकही प्रगणक गट समाविष्ट नव्हता. त्यामुळे आता या वॉर्डाचे नाव बदलून शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर असे ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे लोटाकारंजा वॉर्डात पंचकुआ परिसराचा नव्याने समावेश केला. त्यामुळे लोटाकारंजा-पंकुआ असे नाव देण्यात आले. जयभीमनगर वॉर्डाचे नाव जयभीमनगर- आसेफिया कॉलनी, अल्तमश कॉलनी वॉर्डाचे नाव अल्तमश कॉलनी-रहेमानिया कॉलनी, इंदिरानगर, बायजीपुरा वॉर्डाचे नाव इंदिरानगर- बायजीपुरा उत्तर, इंदिरानगर पूर्व वॉर्डाचे नाव इंदिरानगर पश्चिम, सिडको एन- १ वॉर्डाचे नाव एमआयडीसी चिकलठाणा- ब्रिजवाडी असे करण्यात आले आहे.