औरंगाबाद : आरोपी राजेंद्र जैन याने चोरीचे सोने गहाण ठेवून आणि विक्री करून आलेल्या पैशातून खरेदी केलेली वाहने विशेष तपास पथक जप्त करणार आहे. नांदेड मर्चंट को-आॅपरेटिव्ह बँकेत आणि मुथूट फायनान्समध्ये सोने गहाण ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले. सोन्याचे हे दागिने पोलिसांकडून लवकरच जप्त केले जाणार आहेत.
वामन हरी पेठे सुवर्णपेढीतून सोन्याचे ६५ किलो दागिने पळविणारा राजेंद्र जैन याने विविध खाजगी फायनान्स कंपन्या आणि बँकांमध्ये सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज उचलले होते. या पैशातून २६ वाहने खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यापैकी १४ वाहनांची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. तो वापरत असलेल्या तीन कार पोलिसांनी ताब्यात घेतल्या. मात्र, उर्वरित वाहने विक्री केल्याचे तो सांगत आहे; परंतु आजही ती वाहने जैनच्या नावे आहे. विशेष म्हणजे वाहन खरेदीसाठी तो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेई. नियमानुसार कर्जाची परतफेड होईपर्यंत त्याला फायनान्स कंपनी अथवा बँकेच्या परस्पर वाहन विक्री करता येत नाही. त्यामुळे त्याने केवळ नोटरी शपथपत्रावर आणि आरसीसी पेपरवर स्वाक्षरी करून वाहनांची विक्री केली आहे. आता ही सर्व वाहने पोलिसांकडून जप्त केली जाणार आहे. यामुळे जैनकडून वाहने खरेदी करणारे अडचणीत आले आहेत.बँकांकडून मागविली माहितीविशेष तपास पथकाला प्राप्त कागदपत्राच्या आधारे जैनची शहरातील २५ बँकांमध्ये तब्बल ७० खाते असल्याचे समोर आले. या सर्व बँकांना पोलिसांनी सोमवारी पत्र देऊन जैनच्या बँक खात्याच्या व्यवहाराची माहिती मागविली. तसेच त्याने सोने तारण ठेवून कर्ज घेतले का? आणि त्याचे अथवा कुटुंबियांच्या नावे लॉकर आहे का? याविषयी माहिती देण्याचे कळविले. ही माहिती मिळाल्यानंतर तपासाला अधिक गती मिळणार आहे.जैनच्या अंगावर एक ग्रॅमचा दागिनाही नाहीसुवर्णपेढीतून कोट्यवधींचे दागिने हडपणारा राजेंद्र मात्र सोन्याचा एकही दागिना वापरत नव्हता. त्याच्या अंगावर एक ग्रॅमचा दागिनाही नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय त्याच्या घरझडतीत आणि कारमध्येही केवळ कागदपत्रेच पोलिसांच्या हाती लागली.