औरंगाबाद : एकदम सर्वच वॉर्ड आरक्षित करून सातारा-देवळाईकरांवर हा कोणता सूड उगविला? याविषयी आपल्या भावना मांडण्यासाठी मनपा आयुक्तांच्या भेटीवर निघालेल्या शिष्टमंडळाला बुधवारी भेट नाकारण्यात आली. लवकरच नागरिक आयुक्तांना भेटून आक्षेप नोंदविणार आहेत.
वॉर्ड आरक्षण घोषित झाल्यानंतर सातारा-देवळाईत असंतोष दाटला आहे. या परिसरातील दोनचे पाच वॉर्ड झाले खरे, पण ते सर्वच आरक्षित कोणत्या नियमानुसार करण्यात आले, याचा जाब नागरिक विचारत आहेत. नगर परिषदेचे विसर्जन करून या परिसराचा मनपात समावेश करताना आक्षेप नोंदविला होता, परंतु सातारा-देवळाईच्या नागरिकांचा आक्षेप लक्षात न घेता या परिसराचा समावेश मनपात करण्यात आला. आता सातारा-देवळाईतील वॉर्ड आरक्षणाबाबत थोडाफार विचार करावा. आक्षेपावर काही तरी निर्णय घेण्यास मनपा प्रशासन व निवडणूक विभाग लक्ष देईल काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
आक्षेप नोंदविण्याची तयारीगत चार वर्षांपूर्वी अन्याय के ला; परंतु अद्याप एकही काम मार्गी लावलेले नाही. लोकसंख्येनुसार वॉर्ड वाढविले, परंतु त्यातही रचना अत्यंत वेडीवाकडी करून नागरिकांना पुन्हा चक्रावून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ही सोय कुणासाठी केली? आम्ही त्यासाठी आक्षेप नोंदविणार आहोत. - राजू नरवडे (माजी उपसरपंच)
जुने वॉर्ड विखुरलेआरक्षणाला विरोध नाही; परंतु वॉर्डाची रचना अत्यंत चुकीची केली आहे. मतांची तोडफोड करून राजकीय पोळी भाजण्यावर भर दिलेला दिसत आहे. स्वत:चे वॉर्ड वाचविण्यासाठी सातारा-देवळाईला टार्गेट केले. एका शिष्टमंडळाला आज भेटता आले नाही; परंतु गुरुवारी विविध शिष्टमंडळ आयुक्तालयात धडकणार आहेत. - सोमीनाथ शिराणे ( सातारा-देवळाई संघर्ष समिती).