शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या कमकुवत झाल्या आहेत. पाण्याचा किंचितही वेग वाढविला तर त्या फुटतात. अशा गंभीर परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा वाढविणे खूप आव्हानात्मक आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांनाच पाणी वाढविण्याच्या संदर्भात सूचना केली आहे. तज्ज्ञ अधिकारी यावर अभ्यासही करीत आहेत. सध्या शहराला १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यात आणखी वाढ करण्यासाठी आवश्यक विविध उपाययोजना करण्यात येतील. सर्वप्रथम जायकवाडीतील सर्व जुनाट पंप बदलून नवीन बसविण्यात येणार आहेत. जेथे जलवाहिनी खूपच कमजोर आहे, तेथे बायपास पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या पाण्यात २० एमएलडीची वाढ होईल. यापेक्षा जास्त पाण्याची वाढ करता येणार नाही, असे तज्ज्ञांनी मनपाला सांगितले आहे.
अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
दोन आठवड्यांपूर्वी मनपा प्रशासकांनी पाणीपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली. यामध्ये काही कनिष्ठ तर काही वरिष्ठ आहेत. अधिकाऱ्यांच्या आपसातील गटबाजीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या प्रकरणातही प्रशासक आता लक्ष घालणार आहेत.