लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील सर्वच पाण्याच्या टाक्यांचे आयुष्य संपले असून, काही टाक्या कोणत्याही क्षणी पडू शकतात, असा गौप्यस्फोट मंगळवारी सर्वसाधारण सभेत प्रभारी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे संपूर्ण सभागृह क्षणभर हादरले. स्ट्रक्चरल आॅडिट न करता अधिकारी असा दावा कसा करू शकतात, या मुद्यावर नगरसेवकांनी प्रशासनाची जोरदार कोंडी केली. शहरातील पाण्याच्या टाक्यांची कशी दयनीय अवस्था आहे, याचा पाढाच नगरसेवकांनी वाचला. शेवटी पाण्याच्या सर्व टाक्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट एक महिन्यात करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यावर वाद निवाळला.महापालिकेच्या आरोग्य विभागाने शासन निर्देशानुसार एक ठराव ठेवला. त्यात खुल्या खाजगी जागा, बांधकामाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. संबंधितांनी योग्य उपाययोजना न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस ठरावात केली होती. या ठरावावर चर्चा सुरू असताना नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी शहरातील पाण्याच्या टाक्यांची विदारक अवस्था मांडली. महापालिकेच्या टाक्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. नागरिकांना दंड लावण्यापेक्षा अगोदर आपल्यापासून सुधारणा करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. पाण्याच्या टाक्यांसदर्भात प्रभारी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी खुलासा केला. पाण्याच्या टाक्या कधी स्वच्छ करण्यात आल्या, या प्रश्नावर त्यांनी मे महिन्यात ५६ टाक्या स्वच्छ केल्याचा दावा केला.
शहरातील सर्वच जलकुंभ धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:10 AM