औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ४७ कोटी ३३ लाख २४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता ग्रामविकास विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे जि. प. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या कार्यालयाच्या जागेवर ही इमारत उभारली जाणार असल्याने ही कार्यालये स्थलांतरण करण्याच्या प्रक्रीयेला गती मिळाली आहे. नव्या इमारतीमुळे विखुललेले जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची कार्यालये एकाच छताखाली येतील.
मुंबईत उच्चाधिकार समितीच्या ३ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाला हिरवा कंदिल दाखविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत १४ डिसेंबरला बैठक मुंबईत झाल्यावर त्यांनी जलदगतीने तांत्रिक कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिली. त्यानंतर नियोजित जागेवरील जुने बांधकाम पाडण्यासाठी अंदाजपत्रक, तेथील कार्यालय स्थलांतरणासाठीची प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी सुरू केली होती. मात्र, प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा सर्वांनाच होती. ती मकर संक्रांतीला मिळाली. नव्या दायित्वांवर कात्री लागलेली असताना बांधकाम सभापती बलांडे यांनी पाठपुरावा करत प्रशासकीय इमारतीचा २० वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला.
सध्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची इमारत जुणी व जीर्ण झाली असून, तेथील जागा कार्यालयीन कामकाज, येणाऱ्या अभ्यागतांसाठी, वाहनतळांसाठी अपुरी पडत होती. त्यामुळे तळमजला त्यावर चार मजले असे १० हजार ८३८ चाैरस मीटरचे ४८.८३ कोटींचे बांधकाम मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदावले यांनी प्रस्तावित केले होते. त्यातील ४७.३३ कोटींच्या अंदाजपत्रकास १० अटींच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित इमारतीत ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबवून नैसर्गिक प्रकाश योजना, वायू विजन, पाण्याचा व ऊर्जेचा काटकसर, पर्जन्य जल पुनःर्भरण आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यांचा वापर आवश्यक असणार आहे.
----
कोट
जिल्हा परिषदेच्या सध्याच्या इमारतीच्या मागच्या परिसरातील पावणेतीन एकर जागेवर ही इमारत उभारण्यासाठी माती परीक्षण, सध्या या जागेवरील कार्यालय स्थलांतर, त्यांना पाडण्यासाठी अंदाजपत्रक पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल. प्रादेशिक वास्तुशास्त्रज्ञांनी इमारतीचा नकाशा मंजूर केला. तो मुख्य वास्तुविशारदांकडून मंजुरी करून घेणे, अंदाजपत्रक तयार करणे ही कामेही याच काळात पूर्ण होतील. कार्यालयांच्या स्थलांतरासाठीची प्रक्रिया सुरू असून, सर्वप्रथम शिक्षण विभागाचे स्थलांतर चेलीपुरा येथे होत आहे.
-ए. झेड. काझी, प्रभारी कार्यकारी अभियंता, जि. प. बांधकाम विभाग
---
असे स्थलांतरीत होणार कार्यालये
आरोग्य विभाग आरोग्य उपसंचालक कार्यालय
शिक्षण विभाग : चेलीपुरा येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालय
पंचायत विभागः जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या परिसरात
पशुसंवर्धन विभाग : घाटीसमोरील जि. प. निवासस्थानांत
कृषी विभाग : नारळीबाग येथील जि. प. निवासस्थानांत