लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहशतवादी कारवाया करण्यासाठी शहरात आलेल्या अतिरेक्यांनी हिमायत बाग परिसरात एटीएसच्या पथकावर गोळ्या झाडल्याप्रकरणी एटीएसने विशेष न्यायाधीश व्ही़ व्ही़ पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात आरोपी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप निश्चित करण्यात आला़ आरोपी अबरारला अहमदाबाद जेलमधून औरंगाबाद जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले़ आरोपीच्या उर्वरित साथीदारांपैकी एक आरोपी नाशिक आणि दोन आरोपी नागपूर जेलमध्ये आहेत़ पुढील सुनावणी २४ जुलै रोजी अपेक्षित आहे़एटीएसच्या पथकाला अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अतिरेकी शहरात येणार आणि देशविघातक कृत्य करणार असल्याची माहिती २६ मार्च २०१२ रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यासह पथक उद्धवराव पाटील चौकाजवळील शाळेच्या नजीक असलेल्या हिमायत बाग परिसरात दुपारी साडेबारा वाजता दाखल झाले. त्या परिसरात अतिरेकी फिरत असल्याचे पथकास दिसताच त्यांनी त्या अतिरेक्यांना थांबण्याचा इशारा केला; मात्र त्या अतिरेक्यांनी पथकाच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस हवालदार शेख आरेफ गोळी लागून जखमी झाले होते. बचावासाठी या पथकाने गोळीबार केला असता त्यात अतिरेकी अजहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला, तर दुसरा अतिरेकी महंमद शाकेरच्या पायाला गोळी लागली. रेड्डी यांनी पाठलाग करून अतिरेकी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखा (रा. चंदननगर, इंदौर, मध्यप्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तपास करून अन्वर हुसेन इब्राहिम हुसेन खत्री (रा. लाभारिया, इंदौर, मध्यप्रदेश) याला गजाआड केले. या अतिरेक्याकडून ४ गावठी कट्टे, २ रिव्हॉल्व्हर, १७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले होते. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील शिवाजी नवले यांनी युक्तिवाद केला.
अबरारविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप निश्चित
By admin | Published: July 15, 2017 12:48 AM